कोल्हापूर न्यूज / गगनबावडा /प्रतिनिधी - रघुनाथ दळवी
गगनबावडा तालुक्यातील नरवेली येथील निवृत्त गटशिक्षणाधिकारी ए. बी. पाटील यांच्या मातोश्री श्रीमती हौसाबाई बळवंत पाटील यांनी वयाची ८१ वर्षे पूर्ण केलेच्या निमित्ताने त्यांचे सर्व नातू, नाती, परतवंडे आणि सर्व परिवार यांचेवतिने समाजात एक आदर्श निर्माण करणारा आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा असा एक "हौसाई" प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
हौसाईच्या सहस्र चन्द्रदर्शन सोहळ्याच्या निमित्ताने पाहिल्या दिवशी मातोश्रींच्या हस्ते कुलाचाराचे धार्मिक विधी व होम हवन करण्यात आले. तसेच हौसाईंना ८१ निरंजनाने औक्षण करण्यात आले. दुसर्या दिवशी विविध प्रकारचे धान्य व साखर यांनी मातोश्रींची तुला करण्यात आली. व केक कापून उपस्थितांना स्नेहभोजन देण्यात आले. यावेळी निरंजन, धान्य व साखर ८१ कुटुंबांना दान करण्यात आली.
आजकाल संवेदना हरवत चाललेल्या समाजात वृद्धाश्रमांची संख्या वाढताना दिसत आहे. आई वडिलांच्या अथक परिश्रमातून परदेशात नोकरीसाठी गेलेली मुले जन्मदात्या आई वडिलांच्या अंत्यसंस्काराला सुद्धा येण्यास नकार देतात अशा बातम्या वाचनात येतात. अशा वेळी नरवेलीच्या पाटील परिवाराने नातेवाईक, गावातील सर्व ग्रामस्थ व मित्र मंडळींच्या साक्षीने हा "मातृ सन्मान सोहळा" साजरा केला. तो नव्या पिढीला निश्चितच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरेल यांत शंकाच नाही. दोन दिवस चाललेल्या या मातृ कृतज्ञता सोहळ्याचे कौतुक आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांतून होत आहे.
