तिकिटासाठी तुम्हाला दिल्ली मुंबईला जावे लागले नाही ...संभाजी राजेंची वडिलांना म्हणजे शाहू महाराजांना उद्देशून भावनिक पोस्ट ; अभिनंदन बाबा..!

Kolhapur news
By -

           



                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क


    छत्रपती घराण्याचे कोल्हापूर गादीचे आणि राजर्षी शाहू महाराजांचे वंशज शाहू महाराज छत्रपती यांना काँग्रेस पक्षाकडून कोल्हापूरच्या जागेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे संभाजीराजे छत्रपती कोल्हापूरच्या जागेसाठी इच्छुक होते. पण आपल्या वडिलांनाच उमेदवारी मिळणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर संभाजीराजे यांनी माघार घेतली होती. दरम्यान बाबांना उमेदवारी मिळाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी भावनिक पोस्ट लिहिली आहे.


  शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती भारावले आहेत. त्यांनी ट्विटरवर याबाबत पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. त्यांनी आपल्या वडिलांना उमेदवारी मिळाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. तसेच निवडणुकीत जिंकून येण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


गेले तीन दिवस शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारार्थ मी राधानगरी तालुक्याच्या दौऱ्यावर होतो. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेल्या आणि  घनदाट अरण्यात वसलेल्या 'वाकीघोल' या अत्यंत दुर्गम भागात माझा दौरा होता. परवा रात्री मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मोबाईलला थोडी रेंज आली आणि शाहू छत्रपती महाराजांना उमेदवारी जाहीर झाल्याची बातमी दिसली. मन आनंदून गेले.लागलीच कोल्हापूरला जाऊन महाराजांना भेटण्याची इच्छा झाली. पण लगेचच जबाबदारीचीही जाणीव झाली. हातातले काम... पुढे दिलेला शब्द... आणि पुढचा नियोजित दौरा पूर्ण करूनच कोल्हापूरला निघायचे ठरवले. आज दौरा संपवून घरी आल्यानंतर लगेचच महाराजांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले, असे संभाजीराजे आपल्या ट्वीटमध्ये म्हंटले आहे.