जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह अधिकाऱी धावले मतदार जनजागृतीसाठी ; वाघबीळ ते कोल्हापूर १७ कि.मी. धावणारे पहिले जिल्हाधिकारी

Kolhapur news
By -

 

                


                     कोल्हापूर न्यूज नेटवर्क


    7 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणूकीसाठी  जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून मतदारांना संदेश देण्यासाठी शाहुवाडी येथील डॉक्टर झुंजार माने यांनी  शनिवारी रात्री अडीच वाजता शाहूवाडी येथून त्यांची दौड सुरु केली व सकाळी आठ वाजता पोलीस ग्राउंड कोल्हापूर येथे त्यांची 50 कि. मी. अंतराची दौड पूर्ण झाली. त्यांच्या या दौड दरम्यान अमोल यादव यांनी 38 कि.मी. तर वाघबीळ ते कोल्हापूर यादरम्यान जिल्हाधिकारी अमोल येडगे, चेतन चव्हाण व दिलीप जाधव यांनी 17 कि.मी. अंतराची दौड पूर्ण करुन मतदार जनजागृती केली.


     या दौडच्या शेवटच्या टप्प्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  कार्तिकेयन एस, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संपत खिलारे यांनी सहभाग घेतला. या दौडची सांगता पोलीस परेड ग्राउंड, कोल्हापूर येथे झाली.

         दौडच्या सांगता कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री.येडगे म्हणाले, मतदारांच्या सोयीसाठी प्रत्येक मतदारांच्या घरापासून दोन किलोमीटर अंतराच्या आतच सर्व मतदान केंद्रे आहेत. त्यामुळे 100 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा. जिल्ह्यातील कोणत्याही मतदान केंद्रावर मतदारांची गैरसोय होऊ नये, म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी पिण्याचे थंड पाणी असेल. तसेच उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सावलीची सोय करण्यात आली आहे. वयस्कर व आजारी मतदारांना बसण्यासाठी खुर्च्या व बेंचची व्यवस्था करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन त्यांनी केले.