कोल्हापूर न्यूज नेटवर्क
बस्तवडे बंधाऱ्यानजीक शुक्रवारी बुडालेल्या मुलाचा मृतदेह शनिवारी सकाळी केलेल्या शोध मोहिमेमध्ये आढळून आला आहे . कोल्हापूर येथून आलेल्या रेस्क्यू टीमने ही शोध मोहीम राबवली. शुक्रवारी घडलेल्या या घटनेमध्ये चौघांचा बुडून दुर्दैवी अंत झाला होता.
सविस्तर वृत्तांत :
कागल तालुक्यातील आणूर - बस्तवडे बंधाऱ्यांमध्ये बुडून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून एकाचा शोध सुरु आहे. जत्रेनिमित्त हे सर्वजण जमले होते. या घटनेने कागल तालुक्यावर शोककळा पसरली .
या घटनेमध्ये जितेंद्र विलास लोकरे (३६, मुरगुड), त्याची बहीण रेश्मा दिलीप येळमल्ले (३४, अथणी, कर्नाटक), मामाची मुलगी सविता अमर कांबळे (२७, रूकडी, हातकणंगले) यांचा मृत्यू झाला आहे. तर भाचा हर्ष दिलीप येळमल्ले (१७, अथणी) याचा शोध घेतला जात आहे. कडक उन्हापासून वाचण्यासाठी दुपारीही नदीवर मोठी गर्दी झालेली असते. तसेच सध्या खेडोपाड्यांमध्ये जत्रा, यात्रा सुरू आहेत. या निमित्ताने पाहुण्यांची वर्दळ वाढली आहे. पोहण्याबरोबरच कपडे धुण्यासाठीही नदीकडे राबता वाढला आहे. यामुळे अगदी सायंकाळपर्यंत नदी, तलाव येथे लोकांची गर्दी वाढलेली दिसन येतेयामुळे अगदी सायंकाळपर्यंत नदी, तलाव येथे लोकांची गर्दी वाढलेली दिसून येते. नदीत सुरक्षित पोहण्याकडे लक्ष देण्याची गरज असली तरी त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक दुर्घटना घडत असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात यावर्षीच्या उन्हाळ्यात अशा प्रकारच्या अनेक दुर्घटना घडल्या आहेत. अशीच घटना बस्तवडे बंधाऱ्यानजीक घडली.




