कोल्हापूर न्यूज नेटवर्क
अलिबागमधील येथील एक महिला घरात असताना अचानक रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांना अज्ञात व्यक्तीचा व्हॉट्सअप कॉल आला. टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरेटी ऑफ इंडियामधून आपण बोलत असल्याचे त्याच्याकडून सांगण्यात आले, तुमच्या आधारकार्डचा गैरवापर झाला आहे. आता, तुमचा मोबाईल फोन बंद होणार असल्याचेही सांगण्यात आले. विशेष म्हणजे, याच फोनवर पोलीस अधिकारी दीक्षित मॅडम आणि विश्वास नांगरे पाटील बोलत असल्याचे सांगून महिलेचा विश्वास संबंधित आरोपींनी संपादीत केला.
तुमच्यावर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, ईडी, सीबीआय, मुंबई पोलिस यांच्याकडील गुन्ह्यात अटक वॉरंट असल्याची भीती निर्माण केली. ईडी व इतर यंत्रणेच्या भीतीने ती महिला घाबरली आणि सगळ खरं असल्यासारखे समजून ही महिला फेक फोन कॉलच्या आरोपीच्या जाळ्यात अडकली.
महिला आपल्या बोलण्यात आणि दबावत आल्याचे लक्षात येताच आरोपीने फायदा घेऊन त्या महिलेचे बँकेतील सर्व माहिती घेतली. त्यानंतर, संबंधित महिलेच्या बँक खात्यातून परस्पर ऑनलाईन 40 लाख 73 हजार 719 रुपये गायब केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी पोलिस स्टेशन गाठून घडलेली घटना सांगितली. दरम्यान, पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे.

