ऊत्तुरची लेक बनली जुनागडची असिस्टंट कलेक्टर : आयएएस वृषाली कांबळे कर्तव्यावर रूजू

Kolhapur news
By -

             


                     कोल्हापूर न्यूज नेटवर्क 



   राज्यात महिला, युवतीवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनाचा आलेख एकीकडे  वाढत असताना पूर्ण राज्याला विशेषतः समस्त महिला वर्गाला अभिमानास्पद वाटावी ,अशी एक बाब समोर आली आहे.प्रतिकूल परिस्थितीतून प्रचंड मेहनत व चिकाटीच्या जोरावर भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) प्रवेश केलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तूर (ता.आजरा) या लहानशा गावातील  वृषाली कांबळे यांची गुजरातमधील जुनागड जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून  नियुक्ती झाली आहे. मंगळवारपासुन  त्या कर्तव्यावर रुजू झाल्या आहेत.



  मध्यमवर्गीय आणि बहुजन समाजातील या लेकीच्या उत्तुंग भरारीबद्दल त्यांच्या मित्रपरिवार व परिचिताकडून पूर्ण कुटुंब गेल्या काही दिवसापासून शुभेच्छाच्या वर्षावात न्हाऊन निघत आहे. कांबळे कुटुंब गेल्या अनेक वर्षापासुन ते नवी मुंबईतील नेरूळ सेक्टर२० मध्ये स्थायिक आहेत . प्रोबेशन पिरियड संपल्यानंतर चार दिवसाच्या सुट्टीवर नेरूळ घरी आलेल्या वृषाली यांच्याशी  मित्रवर्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे यांच्यासमवेत मनमोकळ्या गप्पा मारण्याची  संधी मिळाली. त्यातून  त्यांचा संघर्ष  चिकाटी आणि  ठाम वैचारिक भूमिकेचे पदर उलगडत गेले.



   वृषाली यांनी केंद्रीय स्पर्धा परीक्षा (युपीएससी) २०२३-२४ मध्ये त्या ३१० व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या .त्यानंतर देहरादूनमधील मसुरी मधील खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. गुजरात केडर मिळाल्याने राजकोट व नवी दिल्लीमध्ये जवळपास दिड वर्षाचा परिविक्षाधीन कालावधी यशस्वीपणे पूर्ण करीत स्वतंत्र कामकाज पाहण्यासाठी सज्ज झाल्या. त्यांच्या कामाची धडाडी पाहून गुजरात प्रशासनाने त्याच्याकडे सौराष्ट्र मधील महत्वाचा जिल्हा असलेल्या जुनागडमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी (प्रांत अधिकारी) म्हणून जबाबदारी सोपवली आहे.



वृषाली यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण येथील सेंट अगस्तीन स्कूल आणि बारावी एसआयइएस कॉलेजमध्ये झाले त्यानंतर त्यांनी मुंबईतील सेंट झेविअर्स कॉलेजमधून राज्यशास्त्र या विषयातून डिस्टेक्शनसह कला शाखेची पदवी घेतली.वृषालीने कॉलेजमध्ये असतानाच स्पर्धा परीक्षा देण्याचे निश्चित करून तयारी सुरु केली होती. पहिल्या प्रयत्नात ‘प्रिलिम’मध्ये थोड्या फरकाने अपयश आल्यानंतर ’बार्टी’त प्रवेश करुन पुन्हा अभ्यासात झोकून दिले.एक वर्ष दिल्लीत आणि त्यानंतर पुण्यातील होस्टेलमध्ये रोज सरासरी अकरा, साडेअकरा तास तयारी केली.युपीएससीच्या २०२४परीक्षेत देशात ३१० क्रमांक मिळवित आपले उदिष्ट्य गाठले.२४ व्या वर्षात युपीएससी ‘क्रक’ केलेल्या वृषाली यांना २६ व्या वर्षात असिस्टंट कलेक्टर म्हणून कारभाराची धुरा मिळाली आहे. त्यामुळे भविष्यात त्या गुजरातच्या मुख्य सचिव पदापर्यंत सहजपणे पोहचण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.काही दिवसाच्या सुट्टीसाठी नेरूळच्या घरी आलेल्या वृषाली मंगळवारी पदभार स्वीकारणार आहेत, त्यामुळे त्या रविवारी जुनागडसाठी रवाना झाल्या. त्यांच्या उज्ज्वल वाटचालीसाठी मनापासुन शुभेच्छा !



भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि राज्यघटनेवर नितांत श्रद्धा बाळगणाऱ्या या सावित्रीच्या लेकीने खडतर परिश्रमातून मिळविलेल्या यशामुळे राज्यातील गोरगरीब युवक-युवतीसाठी ती प्रेरणादायी बनली आहे. वृषाली यांना प्रशासकीय अधिकाराचा वापर सामान्य जनतेचे जीवनमान जास्तीजास्त उंचवावे, यासाठी करण्याचा त्याचा मानस आहे. केवळ स्पर्धा परीक्षाच नव्हे तर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थांनी त्यामध्ये स्वत;ला झोकून द्यावे, जोपर्यत आपल्या उदिष्ठापर्यंत पोहचत नाही, तोपर्यत सोशल मिडिया आणि मित्राबरोबरच्या छानछोकी “लाईफस्टाइल” पासून दूर रहावे, असा सल्ला त्या देतात.

-जमीर काझी, मुंबई



          ---------------------------------