नानीबाई चिखली बंधाऱ्याची दुरुस्ती करावी : जिल्हा परिषद सदस्या शिवानी भोसले यांची मागणी

Kolhapur news
By -

             


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क



नानीबाई चिखली येथील वेदगंगा नदीवर असणारा बंधारा सध्या नादुरुस्त अवस्थेत आहे. बंधाऱ्याचे बर्गे, काँक्रिट कॉलम व इतर आवश्यक भागांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. बंधारा नादुरुस्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असून उपलब्ध पाणीसाठा लवकर कमी होत आहे. सदर बंधाऱ्यावर चिखली परिसरातील अनेक शेतकऱ्यांची शेती तसेच गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. त्यामुळे पाण्याची गळती वेळेत थांबविणे अत्यंत आवश्यक आहे. बंधाऱ्याची दुरुस्ती न झाल्यास आगामी काळात शेतकऱ्यांचे तसेच गावातील नागरिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.



त्यामुळे चिखली येथील वेदगंगा नदीवरील बंधाऱ्याची तात्काळ पाहणी करून आवश्यक दुरुस्तीचे काम सुरू करावे. बंधाऱ्याचे बर्गे व काँक्रिटची दुरुस्ती करून पाण्याची गळती पूर्णपणे रोखावी, तसेच धरण दुरुस्तीसाठी यापूर्वी ५२ लाख रुपये मंजूर असलेल्या निधीतून सदर कामास प्राधान्य देऊन काम तातडीने पूर्ण करावे  अशी मागणी चिखली जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. शिवानी विजयसिंह भोसले यांनी  कोल्हापूर जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 



     यावेळी चिखलीचे सरपंच युवराज कुंभार, विवेक चाबुकस्वार, नसरुद्दीन नाईक, अनिल घाटगे , बाबासो आरगे, विजय घस्ती उपस्थित होते. 



           --------------------------