जागतिक कुस्तीच्या आखाड्यात महाराष्ट्राच्या महिला मल्लांची गौरवास्पद कामगिरी : केंद्रीय गृहराज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Kolhapur news
By -

             



             कोल्हापूर न्यूज नेटवर्क



महाराष्ट्राला कुस्तीची समृद्ध परंपरा लाभली आहे. आखाड्यात घडणाऱ्या आपल्या महिला कुस्तीगीर आज जागतिक व्यासपीठावर देशाचा नावलौकिक उंचावत आहेत, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. विशेषतः आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या महिला मल्लांनी मिळवलेले यश हे महाराष्ट्रातील नव्या पिढीच्या मुलींसाठी प्रेरणादायी असून, क्रीडा क्षेत्रात नवी स्वप्ने पाहण्याचे आणि ती प्रत्यक्षात साकारण्याचे बळ देणारे आहे  असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले. 




अमेरिकेतील लास वेगास येथे पार पडलेल्या २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड च्या  पै. अमृता पुजारी व ज्युनियर जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक मिळवणाऱ्या पै. तन्वी मुगदुम यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. 


 ते पुढे म्हणाले , जागतिक स्तरावर रौप्यपदक पटकावत अमृताने महाराष्ट्राच्या महिला कुस्ती क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला, तर तन्वीनेही आपल्या पदकविजेत्या कामगिरीतून भारतीय महिला कुस्तीचे सामर्थ्य अधोरेखित केले. या दोघींचे यश म्हणजे कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण सरावाचे फलित आहे. महाराष्ट्राला कुस्तीची समृद्ध परंपरा लाभली आहे. आखाड्यात घडणाऱ्या आपल्या महिला कुस्तीगीर आज जागतिक व्यासपीठावर देशाचा नावलौकिक उंचावत आहेत, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा अध्यक्ष आणि स्वतः एक कुस्तीगीर म्हणून या युवा मल्लांचे यश माझ्यासाठी विशेष आनंददायी आहे. महाराष्ट्राच्या मातीतून असेच जागतिक दर्जाचे खेळाडू घडावेत आणि ऑलिम्पिकसह विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताच्या पदकांची संख्या वाढावी, यासाठी कुस्तीच्या विकासाला आणि युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.


यावेळी कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदीपअप्पा भोंडवे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. मेघराज कटके, आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर पै. सोनबा गोंगाणे आणि वस्ताद पै. दादा लवटे उपस्थित होते.


                        --------------