कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कागल तालुक्यातील सावर्डे बुद्रुक येथे एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेचे तोंड दाबून तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सौ. अंजना हिंदुराव घराळ या आपल्या गावातून घराकडे पायी जात असताना अनोळखी इसमांनी त्यांना अडवले. एका इसमाने त्यांचे तोंड दाबून धरले, तर दुसऱ्या इसमाने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतले. त्यानंतर संशयितांनी मोटारसायकलवरून पळ काढला. याप्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुरगूड आणि इचलकरंजी पोलिसांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. घटनास्थळावरील तसेच आरोपींच्या येण्या-जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या तपासादरम्यान संशयित अथर्व अरुण पौंडकर, रा. सावर्डे बुद्रुक तालुका कागल याची ओळख पटली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता नितेश बाजीराव राऊत रा. बिद्री, शरद मारुती चव्हाण रा.जांभूळवाडी तालुका गडहिंग्लज आणि अन्य एका अनोळखी साथीदाराच्या मदतीने ही चोरी केल्याची माहिती समोर आली.
विशेष म्हणजे, गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या १२ तासांच्या आत पोलिसांनी मुख्य संशयित आरोपीचा शोध लावत त्याला अटक केली. त्याच्याकडून सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली १५ हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल हस्तगत करण्यात आली. या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून इतर संशयितांचा तसेच गुन्ह्याचा पुढील तपास मुरगूड पोलीस करत आहेत. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिकेत कुंडले, सुरेश मेटील तसेच मुरगूड व इचलकरंजी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी केली.
---------------------

