कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले
गोकुळच्या भव्य इमारती समोर श्रीकृष्णाचं सुंदर मंदिर आहे. गोकुळ चे संस्थापक आनंदराव पाटील चुयेकर श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन बाहेर पडले. महादेवराव महाडिक बाहेरच उभे होते. आनंदरावाना ते म्हणाले. "आता तुमचं गोकुळ आमच्या कडे आहे. उत्पादकांनी आम्हांला कौल दिला आहे."
आनंदराव पाटील म्हणाले.
"ठीक आहे. चालवा व्यवस्थित. लोकशाहीचा सन्मान आपण ठेवलाच पाहिजे. त्यानंतर बरीच वर्षे चुयेकरांना गोकुळची सत्ता मिळालीच नाही. त्यांनी कधी तक्रारही केली नाही.ते आज हयात नाहीत. ही घटना त्यांच्या हयातीतील आहे.
2026 च्या गोकुळ निवडणुकीत बंटी पाटील यांचे 13 व महायुतिचे 12 संचालक निवडून आले. साहजिकच गोकुळ चे अध्यक्षपद त्यांचेकडे जायला हवे.महायुतीने त्यात खोडा घातला. कोरम होऊ दिला नाही.मामला कोर्टात गेला. कोर्टाने 10 नोव्हेंबर ची अध्यक्ष निवडीची तारीख दिली आणि नियमानुसार 25 संचालकांना नोटीसा बजावायला सांगितले.म्हणजे 10 तारखेला समविचारी चा म्हणजे बंटी पाटील यांचा अध्यक्ष निवडून येणार हे नक्की झाले.
तेवढ्यात शासन नियुक्त आणि अन्य मिळून 5 संचालक गोकुळ वर पाठवायची रणनीती महायुती सरकारने आखली. त्यापैकी चार जणांना अध्यक्ष निवडीत मताचा अधिकार मिळावा असा कायदाही केला.हे सगळं गोकुळ साठी बरं का.
मराठीत एक म्हण आहे. 'नाला साठी घोडं विकत घेतलं.'
अर्थ स्पष्ट आहे. अध्यक्षपद मिळवण्यासाठी कायदा सुद्धा एका दिवसात केला गेला.म्हणजे दूध उत्पादकांनी समविचारीला जो कौल दिला होता त्याला सुद्धा युती सरकारने मातीत गाडलं.
देवाभाऊना चाणक्य म्हंटल जातं.चाणक्याने चंद्रगुप्ताला सम्राट केले. पराक्रमी चंद्रगुप्ताने पुढे सिकंदराला सुद्धा सीमेवरून परत पाठवले. चाणक्य हा असा महान होता.देवा भाऊंनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी भेट दिली. जरांगेना थोपवलं.पुण्यात दुसरी मेट्रो आणली. कौतुक झालं.
ऊस दरासाठी राजू शेट्टी रस्त्यावर ठाण मांडून बसलेत. शेतकरी घरची झुणका भाकरी आणून खात आहेत. चक्का जाम झालाय. तिकडं सरकारचं लक्ष नाही.गोकुळ साठी मात्र एका दिवसात कायदे सुद्धा केले. यालाच चाणक्य निती म्हणायचे काय? ज्यांनी समविचारीला बहुमत दिले त्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी म्हणून कांही पराभूत संचालकांना पुन्हा शासन नियुक्ती मिळण्याची शक्यता आहे .
आनंदराव पाटील यांनी महाडिकांसमोर जी लोकशाही मान्य केली होती तिचीच लक्तरे तर वेशीवर टांगली गेली नाहीत ना ?महायुती सरकारच्या पाठीराख्यांना सुद्धा हे रुचलेले नाही. त्यांनी आपली नाराजी पत्रकारांसमोर सुद्धा व्यक्त केली आहे.बंटी पाटील गोकुळला काँग्रेस च्या दावणीला बांधतील अशी उगीचच महायुतीला भिती वाटत आहे.म्हणून ही उठाठेव असावी. नाल सापडत नाही म्हणून घोडंच विकत घेतलं.
लोकशाहीच्या नावानं चांगभलं.
---------------------------

