कोल्हापूर न्यूज नेटवर्क
शिक्षण क्षेत्रातील विविध शैक्षणिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी "शैक्षणिक कामे कमी करण्या करण्यासाठीच्या उपायांचा अहवाल " शासनाकडे सादर करण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांच्याकडे सादर केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी दिली .
मुंबईमध्ये 5 जानेवारी रोजी शालेय शिक्षण मंत्री नाम . दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण विषयक बैठकीत सर्व संघटनांनी अशैक्षणिक कामे कमी करून आम्हाला शिकवू द्या अशी मागणी केली होती . मंत्री दादा भुसे यांनी "अशैक्षणीक कामे व ती कमी करण्यासाठी कोणते उपाय योजता येतील " या संबंधीचा अहवाल देण्याचे निर्देश कोल्हापूर विभागाचे उपसंचालक महेश चोथे यांना दिले होते .या अनुषंगाने विविध संघटनांच्या प्रतिनिधींचे एक दिवसाचे चर्चासत्र शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केले होते . दिवसभर चाललेल्या याच्या चर्चासत्रामध्ये दीडशे अशैक्षणिक कामापैकी महत्त्वाच्या 75 अशैक्षणिक कामावर चर्चा होऊन ही अशैक्षणिक कामे कमी करण्याच्या उपायांचा अहवाल तयार केला . यामध्ये प्रामुख्याने ऑनलाईन कामे कमी करण्यासाठी केंद्रस्तरावर एक पूर्ण वेळ डाटा ऑपरेटर नेमावा , बेरोजगार युवक व डी .एड . बी . एड . पदवीधारक , ग्राम पंचायतीचे कर्मचारी यांना काम देऊन त्यांच्याकडून ग्राम स्तरावरीलकामे ,जनजागृती , विविध सर्वेक्षणे , बीएलओची कामे करून घ्यावीत . शालेय पोषण आहारासाठी एकच ॲप तयार करावे , शाळास्तरांवर एकच समिती गठीत करावी, शिक्षक भरती तात्काळ करावी , दोनशे पटावरील शाळांना लिपिक व सेवक द्यावा . विविध प्रशिक्षणांसाठी शिक्षकांना तज्ञ मार्गदर्शक म्हणून न बोलावता डाएटच्या अधीव्याख्यात्यांनीच ही प्रशिक्षणे द्यावीत अशा अनेक सूचना यामध्ये केलेले आहेत . सर्व संघटनां प्रतिनिधीच्या उपस्थितित खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्या हस्ते हा अहवाल शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांच्याकडे सुपुर्त करण्यात आला.
दिवसभर चाललेल्या या चर्चासत्रात महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे ,पूरोगामी प्राथमिक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील , शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर ,जुनी पेन्शन संघटनेच्या जिल्हाध्यक्ष श्वेता खांडेकर ,शिक्षक संघाचे सरचिटणीस विजयकुमार केंद्रे , पुरोगामी महिला आघाडी प्रमुख शारदा वाडकर , कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय कुर्डूकर , कास्ट्राईब महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कांबळे ,रवींद्र वरुटे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते . वस्तुनिष्ठ व योग्य त्या शिफारशीसह हा अहवाल शासनाकडे पाठवीत असल्याचे शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी सांगितले .
-------------------------------------


