कोल्हापूर न्यूज नेटवर्क
हुपरी, इचलकरंजी, कागल तसेच निपाणी पंचक्रोशीतील सर्व संगीत रसिकांचे आवडते गायक हार्मोनियम वादक हुपरीचे श्री चंद्रकांत जोशी वय वर्ष 61 यांचे शुक्रवार दुपारी 3 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ही दुःखद वार्ता समजताच परिसरातील संगीत आणि अध्यात्मिक क्षेत्रात शोककळा पसरली. हजारोंच्या संख्येने निघालेली अंत्ययात्रा हे त्यांनी मनामनात मिळवलेल्या आदराच्या स्थानाचे प्रतीक होते.
गावोगावच्या हरिनाम सप्ताहामध्ये भजन सेवा कीर्तनसाथ सेवा शास्त्रीय संगीत सेवा करीत त्यांनी पारमार्थिक जनांची मने जिंकली होती. महाराष्ट्र भरात सोंगी भजन स्पर्धेमध्ये नेहमीच प्रथम क्रमांक श्री त्रिमूर्ती बालावधुत सोंगी भजनी मंडळ हुपरी यातील मुख्य गायक होते तसेच सलग गेली 42 वर्षे हुपरी ते पंढरपूर आषाढी पायी दिंडी हा वारी सोहळा निष्ठेने चालवित वडील कै.विश्वनाथ जोशी यांची परंपरा जपली होती. स्वतः गाता गाता इतरांना सामील करून घेणे प्रोत्साहन देणे हा त्यांचा स्थायी भाव निस्वार्थ, निस्पृहता, निरागस याचा ते आदर्श होते. अनेकाना त्यांनी हार्मोनियम वादनाचे धडे दिले. अथकपणे त्यांनी रात्रंदिवस अखंडित भजन सेवा केली.
त्यांच्या जाण्याने अनेक गायक वादकांचा आधार गेला आहे ही भावना प्रत्येकाच्या मनात आहे. संपूर्ण परिसरात त्याची हळहळ तीव्रतेने व्यक्त होत आहे. अनेक महिला भजनी मंडळांना ते शिकवीत होते. इचलकरंजी येथील DKTE या शिक्षण संस्थेत संगीत शिक्षक होते. बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळ इचलकरंजी येथे संवादिनी वादन शिकवीत होते. सांगली कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावर ही त्यांनी आपली कलासेवा सादर केली आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक नामवंत गायक कीर्तनकार यांना त्यांनी हार्मोनियम साथ केली आहे. शांत निगर्वी साधे सरळ भाविक असे व्यक्तिमत्व श्री विठ्ठलरूपात विलीन झाले. त्यांच्या निधनाने भजनक्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे.
आपले अकाली जाणे हे आमचे दुर्दैव,आपुली स्मृती तेवत राहील मनी सदैव.
----------------------------

