भारतीय संविधानाची प्रत भेट देऊन आपल्या आवडत्या गुरुवर्याचा निरोप समारंभ

Kolhapur news
By -

 

             



                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क


      डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर चिखली या ठिकाणी कार्यरत असलेले मुख्याध्यापक अण्णासाहेब पाटील हे काही दिवसापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्या मंदिर चिखली येथून पदोन्नती होऊन विद्या मंदिर  करनूर  या ठिकाणी मुख्याध्यापक पदावर त्यांची बदली झाली . यानिमित्त त्यांचा निरोप समारंभ शुक्रवारी भावपूर्ण वातावरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर, चिखली या ठिकाणी पार पडला . 


यावेळी शाळा बचाव समितीच्या वतीने माजी सैनिक व वृक्षमित्र महादेव इ. कांबळे यांच्यासह कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या प्रमुख मान्यवरांच्या  हस्ते "भारतीय संविधानाची" प्रत व भेटवस्तू देऊन  अण्णासाहेब पाटील  यांचा  गौरव करण्यात आला . सदर कार्यक्रमास नानीबाई चिखली गावचे सरपंच  युवराज कुंभार, माजी सरपंच व सेवानिवृत्त मुख्याध्यापक अल्लाबक्ष सय्यद , शिक्षक नेते ओमाजी कांबळे  ,विशाल चिखलीकर,  दादासो चिखलीकर ,युवा नेते वैभव गळतगे इ. मान्यवर उपस्थित होते. 


      सदर कार्यक्रमास विद्यार्थी, सहकारी शिक्षिका तसेच मान्यवरांनी  पाटील सर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणारी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळा व्यवस्थापन समिती, शाळा बचाव समितीने तसेच विद्यार्थ्यांनी विविध भेटवस्तू आपल्या प्रिय गुरुजींना भेट दिल्या. यावेळी गुरुवर्य अण्णासाहेब पाटील यांनी नवीन शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होऊन दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करेन अशी ग्वाही मान्यवरांना व विद्यार्थ्यांना दिली. 


याप्रसंगी विद्यालयाच्या अध्यापिका औंधकर मॅडम व  सरिता कांबळे मॅडम तसेच विद्यार्थी ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार  अध्यापिका  औंधकर मॅडम यांनी व्यक्त केले. शेवटी भावपूर्ण वातावरणामध्ये गुरुजींना  निरोप देण्यात आला. अण्णासाहेब पाटील यांनी आपल्या आवडत्या शाळेला भेट म्हणून पंधरा हजार रुपये किमतीची तिजोरी भेट देण्याचा संकल्प व्यक्त केला. शेवटी अश्रूंनी ओलावलेल्या डोळ्यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रिय गुरुवर्यांना निरोप दिला.

     

          




             ---------------------------------