नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून देशवासीयांना उद्देशून केलेल्या ऐतिहासिक भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सुदर्शन चक्र मोहीमे’ची घोषणा केली. पुढील दहा वर्षांत, म्हणजेच २०३५ पर्यंत, भारताचे सुरक्षा कवच अधिक विस्तारण्याचा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज करत बळकट करण्याचा रोडमॅपच त्यांनी मांडला. भगवान श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्रातून प्रेरणा घेत, देश स्वतःची ‘आयर्न डोम’सारखी बहुस्तरीय संरक्षण प्रणाली उभारणार असून ती सामरिक, धार्मिक आणि नागरी अशा सर्व महत्त्वाच्या स्थळांचे रक्षण करणार आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले की ‘सुदर्शन चक्र मोहीमे’चे उद्दिष्ट प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने शत्रूवर पाळत ठेवणे, त्याला अडथळा निर्माण करणे आणि त्वरित प्रत्युत्तर देणे हे असेल. यामुळे हवाई, जमिनीवर येणारा तसेच सागरी क्षेत्रावरील कोणताही धोका जलदगतीने निष्प्रभ करता येईल. स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात त्यांनी भारताच्या लढाऊ विमान प्रकल्पासाठी स्वदेशी जेट इंजिन विकसित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रात अधिक प्रगतीची गरज असल्याचेही सांगितले. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाबद्दल सशस्त्र दलांचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदींनी नमूद केले की, या कारवाईमुळे पाकिस्तानला मोठा फटका बसला असून झालेल्या नुकसानीची नवी माहिती दररोज समोर येत आहे.
यावर्षी मोदींनी आतापर्यंतच्या सर्वात दीर्घ स्वातंत्र्यदिनाचा भाषण विक्रम प्रस्थापित केला. लाल किल्ल्यावरून त्यांनी तब्बल १०३ मिनिटे (१ तास ४३ मिनिटे) भाषण केले, ज्यामुळे २०२४ मधील ९८ मिनिटांच्या त्यांचा आधीचा विक्रम मोडला गेला. त्यांचा स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाचा पहिला विक्रम २०१५ साली ८८ मिनिटांच्या भाषणाचा होता.
‘सुदर्शन चक्र मोहीमे’ची उद्दिष्टे काय आहेत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, नव्या ‘सुदर्शन चक्र मोहीमे’चा मुख्य उद्देश भारताच्या सामरिक, नागरी आणि धार्मिक स्थळांना संभाव्य शत्रूंच्या हल्ल्यांपासून संरक्षण देणारे एक मजबूत कवच निर्माण करणे आणि त्याचबरोबर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे विकसित करणे हा असेल. ही प्रणाली इस्रायलच्या जगप्रसिद्ध ‘आयर्न डोम’ या संरक्षण कवचाच्या तोडीस तोड असेल, अशी अपेक्षा आहे. ‘आयर्न डोम’ ही बहुस्तरीय संरक्षण प्रणाली असून २०१० पासून हमास आणि हिझबुल्ला यांची हजारो रॉकेट्स यशस्वीपणे अडवण्यात तिने भूमिका बजावली आहे. इस्रायलने दिलेल्या माहितीनुसार, या प्रणालीचा यशाचा दर ९० टक्क्यांहून अधिक आहे.
-------------