अरविंद पाटील यांना राष्ट्रीय 'गोपाळ रत्न' पुरस्कार : देशातील सर्वोत्कृष्ट पशुपालक म्हणून पहिला क्रमांक

Kolhapur news
By -

 

               


         


               कोल्हापूर न्यूज नेटवर्क



 केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागातर्फे देण्यात  येणारा 'गोपाळ रत्न' पुरस्कार  नानीबाई चिखली येथील अरविंद यशवंत पाटील यांना देशातील सर्वोत्कृष्ट पशुपालक म्हणून पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांना पाच लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह तसेच प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. २६ नोव्हेंबरला दूध दिनानिमित्त नवी दिल्लीत केंद्रीय पशुसंवर्धन व दूध व्यवसायमंत्री राजीव रंजन सिंह, राज्यमंत्री एस. पी. सिंह बघेल यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. 

सर्वोत्तम दूध उत्पादकांना केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागातर्फे दुग्ध व्यवसायात भरीव काम करणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार दिला जातो. यंदाच्या (२०२५) पुरस्कारासाठी देशभरातून २०८१ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातून देशभरातील चार व हिमालयीन प्रदेशासाठी विशेष पाच पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

   अरविंद पाटील यांना बेस्ट डेअरी फार्मर म्हणून रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अरविंद पाटील यांनी १९९६ मध्ये सुरुवातीला कर्ज काढून पाच गायीपासून मुक्त गोठा सुरू केला होता. आज त्यांच्या गोठ्यात मुरा म्हशी ७०, एच एफ २०, गीर व इतर जातीची ४० अशी १३० च्या वर जनावरे आहेत. आज दररोज प्रति दिन सहाशे लिटरपर्यंत दूध संकलन होते. दहा एकरांमध्ये पौष्टिक चाऱ्याची लागवड केली जाते. बहुतांशी जनावरे घरची केली आहेत. ब्रिडिंगवर सातत्याने काम चालते. मिल्क मशीन, मुक्त गोठा, सायलेज, सोलर पॅनेल या बाबींबरोबर उपपदार्थही तयार केले जातात.

आतापर्यंत त्यांना जिल्हा परिषदेचा आदर्श गोठा पुरस्कार, गोकुळ श्री पाच वेळा पुरस्कार तसेच विविध संस्था, संघटना यांचेकडून मानपत्र देऊन गौरवण्यात आले आहे.

 दशकांच्या कठोर श्रमांची कमाई

    दुग्ध व्यवसायात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी तब्बल ३० वर्षे सातत्याने परिश्रम घेऊन असंख्यांना रोजगाराच्या वाटा उघडणारे नानीबाई चिखलीचे श्री. अरविंद यशवंत पाटील यांना राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2025 जाहीर हाेणे ही चिखलीकरांसाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. हा राष्ट्रीय सन्मान २६ नोव्हेंबर २०२५ रोजी, दिल्ली येथे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते प्रदान होणार आहे. या यशामागे त्यांची जिद्द, लोकांचे पाठबळ आणि दशकांच्या कठोर श्रमांची कमाई आहे. 

                
         ---------------------------