कागलच्या राजकीय आखाड्यातील उस्तादोंके उस्ताद.

Kolhapur news
By -

    


             कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले 


     कागलचा राजकीय आखाडा महाराष्ट्रात आदर्श नमुना मानला जातो. याला काही जण राजकारणाचे विद्यापीठ असेही म्हणतात. आपण थोडे मागे जाऊ... 


कागलच्या नेतृत्वाची सुरुवात झाली विमलाबाई बागल यांचे पासून. त्यानंतर दौलतराव निकम ,शामराव भिवाजी पाटील यासारखे  मातब्बर नेते कागलला मिळाले. त्यांचे बोट धरून कागलच्या आखाड्यात दोन मातब्बर योद्धे उतरले.ते म्हणजे स्व. सदाशिवराव मंडलिक आणि स्व.विक्रमसिंह घाटगे. या दोघांनी बरीच वर्ष कागलचा आखाडा झुंजवला होता आणि गाजवलाही होता.त्यांनी कधी लुपाछुपीचा खेळ केला नाही.समोरासमोर शडुडु ठोकले.एकमेकांची पोस्टर फाडली.ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांच्या मिरवणुका सुद्धा काढल्या, प्रत्येक घराच्या छप्परावर आपला झेंडा रोवला.त्यावेळी आचारसंहिता नव्हती.'राजा आणि प्रजा' हे नॅरेशन त्यावेळी बरेच गाजले.दोघेही इतिहास ठेवून गेले.कागदावर एक शब्दही न लिहता जनमानसावर मात्र आपली नावे कोरून  गेले.दोघेही उत्तम वस्ताद होते.त्यांनी राजकीय कुस्तीचा आखाडा खेळवला होता मळवला होता .


  त्यांचेच चेले आज नव्या आखाड्यात उतरले आहेत.ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजय बाबा घाटगे , शाहू ग्रुप चे सर्वेसर्वा  समरजीत सिंह घाटगे या चौघांनी आता तालुक्याची कमान सांभाळली आहे.नाम.हसन मुश्रीफ ३० वर्षे राज्यशासनात मंत्रिपदे भूषवित आहेत.उत्तम संघटन कौशल्य आहे . प्रा. संजय मंडलिक उच्च विद्याविभूषित आहेत.उत्तम वक्तृत्व शैली आहे. वडिलांच्या कर्तृत्वाचा वसा पाठीशी आहे. संजयबाबा यांनी नावाप्रमाणे बाबा या आपुलकीच्या नावाने जनमानसात नाव कोरले  आहे. समरजितसिंह यांनी सोनेरी  सिंहासनावरुन पायउतार होत तळागाळात जाऊन युवकांचे संघटन केले आहे.मुरगूड चे पाटील बंधु रणजीतसिंह व प्रवीणसिंह यांनी वरील सगळ्यांशी प्रामाणिक मैत्री केली ,सर्वांना मदत केली पण स्वाभिमानाशी कधी तडजोड केली नाही.संताजी ,धनाजी प्रमाणे प्रसंगोपात राजकीय लढती देत राहिले.


    सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे.त्यात तालुक्यातील कागल व मुरगूड या नगरपालिकांच्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी सत्ता संघर्ष सुरू आहे.कागल मध्ये मुश्रीफ यांचा राष्ट्रवादी पक्ष व समरजितसिंह घाटगे यांचा शाहू ग्रुप यांची अनपेक्षित युती झाली आहे.एक तपाचे राजकीय विरोधक एका रात्रीत एकत्र आल्याने सगळ्यांनीच डोक्यावर हात मारून घेतला.एकेकाळी संजय घाटगे यांना शह देण्याकरिता मुश्रीफ हे समरजितसिंह यांना व्यासपीठावर घेऊन प्रचार करायचे. संजयबाबा निवडणुकीच्या राजकारणातून जरा अलिप्त झाल्यावर मुश्रीफ यांनी त्यांना मित्र म्हणून जवळ केले.कागलच्या निवडणुकीत संजबाबा  खिडकीतून पहात बसतील असे वाटत नाही. संजय मंडलिक यांनी जनतेच्या स्वाभिमानाला आवाहन करत नेटाने लढायचे ठरवले आहे.


 एकमेकांवर टीका करत बसायची वेळ नाही म्हणून  मुरगूड मधील  गौड बंगाल वाटणारे वातावरण सुद्धा एका रात्रीत बदलून गेले.सौ.सुहासिनीदेवी प्रवीणसिंह पाटील यांना शिवसेनेतून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करून प्रवीणसिंह पाटील गटाशी त्यांनी युती केली.तिकडे सौ.तसनीम राजेखान जमादार यांची ही उमेदवारी राष्ट्रवादी गटाकडून जाहीर झाली.दहा हजारांच्यावर मतदार असलेल्या या मोक्याच्या नगरपरिषदेवर आपल्या गटाचा झेंडा फडकवण्यासाठी या आघाड्या सज्ज झाल्या आहेत.नगराध्यक्ष पदाची टक्कर काट्याची होणार असे वातावरण आहे. महालक्ष्मीचा आशीर्वाद , लक्ष्मीची साथ आणि विकासाची धून या  तिन्हींचे महत्व अधोरेखित झाले आहे. सर्वच नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पालक मंत्री प्रकाशराव आबिटकर सुद्धा यात उतरले आहेत.


    स्व.मंडलिक साहेब आणि विक्रमसिंह राजे अशी  राजा प्रजा लढत राहिलेली नाही.ते दोघे वस्ताद होते तर आताचे हे सगळे नेते 

"उस्तादोंके उस्ताद " आहेत .

कागल तालुक्याला राजकारणाचे विद्यापीठ म्हणतात ते एवढ्याचसाठी.


                 ----------------------------