ग्रामविकासासोबतच गाव सुरक्षतेसाठी पत्रकारांनी ताकदीने लेखणी चालवावी – पद्मश्री पोपटराव पवार : ग्रामीण भागात पत्रकारांचा कार्यक्रम घेण्याचा नवा पायंडा – मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख

Kolhapur news
By -

 

               



          कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


    मुंबई : समाजाला दिशा देण्यामध्ये प्रसारमाध्यमांचे काम नेहमीच महत्त्वाचे राहीले आहे. आज ग्रामीण भागातून शहराकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर वाढले असून गावांचे अस्तित्व नष्ट होऊ लागले आहे. आपल्या महाराष्ट्राला मोठी वारंकरी परंपरा असून या संत परंपरेने उभा राहिलेला गावगाडा आज मरणासन्न अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत गाव सुरक्षित ठेवण्यासाठी पत्रकारांनी त्यांची लेखणी ताकदीने चालवणे गरजेचे आहे. कारण आपल्या देशातील शहरे सुरक्षित राहण्यासाठी सर्वात प्रथम गाव सुरक्षित राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन  आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. 


बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान आणि स्वातंत्र्य सैनिक माणिकराव देशमुख यांच्या नावानं देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण देवडी (जि.बीड) येथील माणिकबागेत पोपटराव पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. 


याप्रसंगी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्यासह उपमुख्यमंत्र्यांचे आरोग्य कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कोषाध्यक्ष मन्सूर शेख, उपाध्यक्ष गोपी लांडगे, राज्य प्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी, सह प्रसिद्धीप्रमुख भरत निगडे, डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे, नाशिक विभागीय अधिस्विकृती समितीचे सदस्य विजयसिंह होलम, परिषदेचे बीड विभागीय सचिव रवी उबाळे,  अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सूर्य़कांत नेटके, पुणे जिल्हाध्यक्ष लोणकर, बीड जिल्हा अध्यक्ष विशाल साळुंके, विभागीय संघटक सुभाष चौरे, वडवणी तालुका अध्यक्ष सतीश सोनवणे यांच्यासह राज्यभरातून आलेले पदाधिकारी, पत्रकार यांच्या उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक देखील या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर झाली.


पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले, आज मुंबईसह राज्याच्या विविध प्रमुख शहरातील पत्रकारांना ग्रामीण भागात घेऊन येण्यामध्ये एस.एम.देशमुख यांचा मोठा वाटा आहे. पत्रकारांसाठी ते करीत असलेले काम उल्लेखनीय आहे. देशमुख यांनी आज पत्रकारांची देवडी सारख्या ग्रामीण भागात बैठक घेऊन खऱ्या अर्थाने एक चांगला संदेश दिला आहे. यानिमित्ताने ग्रामिण भागातील प्रश्न शहरी भागातील पत्रकारांना समजण्यासाठी नक्कीच मदत होईल. याशिवाय देवडी येथून एक चांगला संदेश देशभर जाईल, असेही पवार म्हणाले. 


पद्मश्री पवार पुढे म्हणाले, ग्रामविकास आणि कृषी हा भारताचा आत्मा आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राकडे व ग्रामविकासाकडे पत्रकारांनी लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या लेखणीतून या दोन्ही क्षेत्राला न्याय कसा मिळेल, यावर भर देण्याची आवश्यकता आहे. सत्तेमध्ये राजकर्ते कोणत्या पक्षाचे आहेत, यापेक्षा त्यामधील नेत्यांचे ग्रामीण विकासाबाबत व्हिजन नेमकं काय आहे, हे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीनेही पत्रकारांनी लेखणी केली पाहिजे. आपल्या लेखणीतून गाव, गावची शेती, शेतकऱ्यांच्या प्रयोगशील गोष्टी समोर आणण्याची जबाबदारी पत्रकारांनी आता स्वतःच्या खांद्यावर घ्यावी, असेही पवार म्हणाले. 


यावेळी पोपटराव पवार यांनी हिवरेबाजार प्रवास सांगतानाच या प्रवासामध्ये अहिल्यानगरसह राज्यभरातील पत्रकारांचे कसे योगदान आहे, याबाबत सविस्तर माहिती दिली. 


ग्रामीण भागात पत्रकारांचा कार्यक्रम घेण्याचा नवा पायंडा – एस.एम.देशमुख


परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यावेळी म्हणाले की, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद या संस्थेची स्थापना १९३९ साली झाली असून परिषद आता शतकोत्तर महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे. यंदा आम्ही प्रथमच ग्रामीण भागात परिषदेची बैठक व पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करून नवा पायंडा सुरू केला आहे. कारण राज्यभरात परिषदेचे १२ हजार पत्रकार सदस्य असले तरी यामध्ये शहरी पत्रकारांची संख्या देखील मोठी आहे. या पत्रकारांनी ग्रामीण भागात यावे, तेथील प्रश्न समजून घ्यावे, शेती, शेतकरी यांचे प्रश्न त्यांना समजावेत, यासाठी आम्ही आता ग्रामीण भागात पत्रकारांचे जास्तीतजास्त कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली आहे, असेही एस.एम.देशमुख यांनी स्पष्ट केले. 


ते पुढे म्हणाले, आज स्वातंत्र्य सैनिक माणिकराव देशमुख यांच्या नावानं देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण व बीड जिल्ह्याच्या जडणघडणीत ज्या पत्रकारांचे योगदान राहिले आहे, अशा पाच ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार आज आम्ही करीत आहोत. यामध्ये दिव्यांगांना न्याय मिळवून देणारे दीपक कैतके आणि मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे तसेच बीड जिल्ह्यातील आदर्श शेतकरी कल्याणराव कुलकर्णी या बीड जिल्ह्याच्या सुपूत्रांचा सन्मान करीत आहोत.  याशिवाय माणिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठानच्यावतीने समाजसेवा, पत्रकारिता आणि कृषी क्षेत्रात योगदान देणाऱ्या तीन मान्यवरांचा सन्मान पद्मश्री पोपटराव पवार, मंगेश चिवटे यांच्या हस्ते केला आहे. किसानपुत्र चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे आणि आयुष्यभर चळवळीसाठी मोठे योगदान देणारे अमर हबीब, अगोदर दैनिक मराठवाडा आणि नंतर माजलगाव समाचारच्या माध्यमातून आदर्श पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार सुहास देशमुख आणि अनेक अडचणींवर मात करून शेतीत नवनवे प्रयोग करणारे देवडी येथील आदर्श शेतकरी गोरख झाटे यांना अनुक्रमे समाजभूषण, पत्रभूषण आणि कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे, असेही त्यांनी सांगितले. 


उपमुख्यमंत्र्यांचे आरोग्य कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी यावेळी पत्रकारांसाठी असणाऱ्या विविध आरोग्य योजनांची माहिती दिली. तसेच जास्तीतजास्त पत्रकारांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टिवकर यांनी प्रास्ताविक केले. आभार विशाल सोळुंके यांनी मानले. 


       ---------------------------------