कोल्हापूर न्यूज नेटवर्क
देवाच्या चरणी भक्त जे काही अर्पण करतो, ते केवळ पैसे नसतात. त्यामागे असते श्रद्धा, विश्वास आणि मनापासून केलेली सेवा. एखाद्या मंदिराच्या दानपेटीत भक्ताने टाकलेली शंभर रुपयांची नोट असो किंवा कोट्यवधी रुपयांची देणगी त्या प्रत्येक रुपयामागे एका भक्ताची भावना जोडलेली असते. म्हणूनच मंदिरातील देणगीचा गैरवापर किंवा आर्थिक गैरव्यवहाराची बातमी समोर आली की, धक्का केवळ मंदिर व्यवस्थापनाला बसत नाही तर, तो थेट भक्तांच्या श्रद्धेलाच बसतो.
अयोध्येतील राम मंदिराच्या देणगीबाबतही विविध आरोप आणि प्रश्न यापूर्वी चर्चेत आले आहेत. आता बाळूमामा देवस्थानाशी संबंधित कोट्यवधी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे. ६०.७५ कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी तत्कालीन निरीक्षकासह सचिवावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील सत्य तपासातून आणि न्यायालयीन प्रक्रियेतून समोर येईल. दोष सिद्ध होईपर्यंत संबंधितांना कायदेशीरदृष्ट्या निर्दोष मानले पाहिजे. मात्र या घटनेने एक अत्यंत गंभीर प्रश्न नक्कीच उपस्थित केला आहे भक्तांनी श्रद्धेने दिलेल्या देणगीच्या पैशांचे संरक्षण कोण करणार.
बाळूमामा हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. भक्त दूरदूरहून येतात. नवस बोलतात, दर्शन घेतात आणि आपल्या कुवतीनुसार देणगी देतात. कुणी दहा रुपये देतो, कुणी शंभर रुपये, तर कुणी लाखो रुपये. पण देणगी कितीही असो, त्या पैशांमागे भक्ताची भावना समान असते.भक्त मंदिराच्या व्यवस्थापनावर विश्वास ठेवतो. त्याला वाटते की, आपण दिलेला पैसा देवस्थानच्या विकासासाठी, भाविकांच्या सुविधांसाठी, धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी वापरला जाईल. मंदिर परिसर स्वच्छ राहावा, भक्तांसाठी चांगल्या सुविधा निर्माण व्हाव्यात, अन्नछत्रे चालावीत, गरजूंची सेवा व्हावी या भावनेने तो देणगी देतो.पण जेव्हा मंदिरातील आर्थिक व्यवहारांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या बातम्या समोर येतात, तेव्हा सामान्य भक्ताच्या मनात स्वाभाविकपणे प्रश्न निर्माण होतो. आपण श्रद्धेने दिलेला पैसा खरोखर देवाच्या कामासाठी वापरला जातोय का.
हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे.
कारण मंदिरातील देणगी ही कोणत्याही व्यक्तीची खासगी मालमत्ता नाही. ती भक्तांची सामूहिक श्रद्धा आहे. ती सार्वजनिक विश्वासाची ठेव आहे. त्यामुळे देवस्थानच्या कारभारात पारदर्शकता असणे ही केवळ प्रशासकीय गरज नाही, तर ती भक्तांप्रती असलेली नैतिक जबाबदारी आहे.
आज अनेक भक्तांच्या मनात अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे. 'देवाला देणगी द्यावी की नाही' असा विचार भक्तांच्या मनात येऊ लागला, तर त्यासाठी भक्तांना दोष देता येणार नाही. कारण श्रद्धेने दिलेला पैसा गैरव्यवहाराच्या संशयाच्या भोवऱ्यात अडकला, तर विश्वासाला तडा जातो.म्हणूनच आता काळाची गरज आहे ती मंदिर व्यवस्थापनाच्या कारभारात अधिक पारदर्शकता आणण्याची. देवस्थानच्या प्रत्येक देणगीचा हिशेब सार्वजनिक झाला पाहिजे. वर्षातून एकदा तरी स्वतंत्र आणि निष्पक्ष लेखापरीक्षण झाले पाहिजे. देणगी कुठून आली, किती आली आणि कुठे खर्च झाली, याची माहिती भक्तांना सहज उपलब्ध झाली पाहिजे. मोठ्या खर्चाच्या व्यवहारांमध्ये नियमांचे पालन झाले पाहिजे. निर्णय प्रक्रियेत उत्तरदायित्व असले पाहिजे.
देवाच्या नावावर जमा होणारा पैसा हा देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांचा किंवा अधिकाऱ्यांचा वैयक्तिक पैसा नाही. तो भक्तांच्या विश्वासाचा पैसा आहे.म्हणूनच गैरव्यवहाराचा संशय निर्माण झाला की चौकशी झालीच पाहिजे. दोषी आढळल्यास कठोर कारवाई झाली पाहिजे. देवस्थान व्यवस्थापनाने स्वतःहून पारदर्शकतेचे सर्वोच्च निकष निर्माण केले पाहिजेत.भक्तांना देवावरचा विश्वास कमी झालेला नाही, त्यांना माणसांच्या व्यवस्थापनावरचा विश्वास टिकवायचा आहे.देवस्थानात भ्रष्टाचाराला थारा नको. देणगीच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांना कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा प्रशासकीय दबावाशिवाय कायद्याच्या चौकटीत आणले पाहिजे. आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे, अशी वेळ पुन्हा येऊ नये यासाठी व्यवस्था उभी केली पाहिजे.आजचा भक्त प्रश्न विचारतोय, कारण त्याची श्रद्धा खरी आहे.
"मी देवाला दिलेला पैसा सुरक्षित आहे का?"
या एका प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देण्याची जबाबदारी देवस्थानच्या प्रत्येक विश्वस्ताची, पदाधिकाऱ्याची आणि संबंधित प्रशासनाची आहे.कारण भक्त देणगी देतो ती प्रसिद्धीसाठी नाही, मोबदल्यासाठी नाही आणि कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी तर अजिबात नाही.
तो देतो देवासाठी.आणि म्हणूनच देवाच्या चरणी अर्पण झालेला प्रत्येक रुपया हा पवित्र आहे. त्या रुपयाचा गैरवापर म्हणजे केवळ आर्थिक गुन्हा नाही; तो लाखो भक्तांच्या विश्वासाशी केलेला विश्वासघात आहे.देवस्थानातील देणगीच्या पैशांचा हिशेब स्वच्छ असेल, तर भक्तांची श्रद्धा अधिक दृढ होईल. पण हिशेबात संशय निर्माण झाला, तर देवाच्या दारातही प्रश्नचिन्ह उभे राही .
आता वेळ आली आहे देवस्थानांनी भक्तांकडून केवळ देणगी मागण्याची नव्हे, तर त्या देणगीचा प्रत्येक रुपया कुठे खर्च झाला याचा हिशेब भक्तांसमोर ठेवण्याची. श्रद्धा भक्तांची आहे देणगी भक्तांची आहे, त्यामुळे तिच्या प्रत्येक रुपयाचे उत्तरही भक्तांना मिळालेच पाहिजे.
- एस. पी. गायकवाड
----------------------------


