कोल्हापूर न्यूज / वि. रा.भोसले
राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या गोकुळ दूध संघावार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने सत्ता स्थापनेपर्यंत मजल मारली आहे. राज्याच्या सत्तेवर असलेल्या तीन बलाढ्य पक्षांच्या युतीला हा मोठा धक्का मानावा लागेल. दुसऱ्या शब्दांत या सत्ता बदलला सतेज क्रांती असेच म्हणावे लागेल. ठराव धारकांनी सुद्धा दूध उत्पादकांच्या मेहनतीचा सन्मान ठेऊन केलेले मतदान म्हणजे युतीला स्वाभिमानी दणका आहे असेही म्हणावे लागेल.
"गोकुळ मधील टी 25 सामना" आणि "गोकुळचे गौड बंगाल" अशी दाेन वार्तापत्रे 'कोल्हापूर न्यूज नेटवर्क' ने या पूर्वी प्रसिद्ध केली होती.
दूध उत्पदाकांच्या हितासाठी काम करणारे संचालक मंडळ असावे मग ते कोणाचेही असो अशी अपेक्षाही व्यक्त केली होती. त्याबरोबर संस्थापक स्व.आनंदराव पाटील चुयेकर यांच्या योगदानाला योग्य न्याय मिळावा असेही म्हंटले होते.
ठरावधारकांनीसुद्धा अमिषाना आणि शपथांना बळी न पडता केवळ उत्पदाकांच्या हिताचा विचार केलेला आहे असे दिसते. ज्यांनी कधी गायीचा गोठाही पाहिला नव्हता ते गोकुळ ची हंडी फोडण्यासाठी एक गठ्ठा युतीने एकत्र आले होते. प्रचंड मताधिक्याने सत्तेवर आलेल्या महायुतीला गोकुळ च्या निकालाने डोके खाजवायला लावले आहे. पुण्या मुंबईत बसून कोल्हापूरच्या मातीला आव्हान देता येणार नाही हे दादा आणि भाऊ यांना ही कळले असावे. ना. मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील सहकारी संस्थांना सुद्धा हे एक प्रकारचे आव्हान दिसत आहे.
राजकीयदृष्टया विचार केला तर ही क्रांती काँग्रेस किंवा विरोधी महाविकास आघाडीने नव्हे तर एकट्या बंटी पाटलांच्या लाजबाब संघटन कौशल्य आणि उत्पादक हिताचा विचार करून केलेल्या पक्षविरहित नेतृत्वाने घडवून आणली आहे. म्हणूनच या सत्ता बदलाला 'सतेज क्रांती' असे म्हणता येईल किंवा युतीला दाखवलेला 'कोल्हापुरी हिसका' किंवा 'दूध उत्पादकांचा स्वाभिमानी दणका' असेच म्हणावे लागेल.
---------------



