शिक्षक भरतीत ११,०८५ जागा भरल्या; उर्वरित ५,७१७ जागा फेरीनिहाय भरणार

Kolhapur news
By -

              कोल्हापूर न्यूज नेटवर्क


 राज्यात भावी पिढी घडवणाऱ्या युवकांसाठी चांगली बातमी आहे. राज्यातील ११ हजार ८५ उमेदवारांचे शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. गेल्या २० वर्षांतील ही राज्यात सर्वात मोठी शिक्षक भरती आहे. या भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. शिक्षकांच्या २१ हजार ६७८ जागांपैकी मुलाखत न देता १६ हजार ७९९ पदांची भरती करण्यात येणार होती. त्यातील आता ११ हजार ८५ उमेदवारांची गुणवत्ता यादी शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. राज्यात पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात आली.


बहुप्रतीक्षित शिक्षक भरतीची निवड प्रक्रिया शालेय शिक्षण विभागाकडून राबवण्यात येत आहे. राज्यात शिक्षकांची २१ हजार ६७८ जागा उपलब्ध असून, त्यापैकी मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ जागा भरल्या जाणार आहेत. मात्र, ११ हजार ८५ उमेदवारांची शिफारस आल्याने पहिल्या टप्यात ही पदे भरली जाणार आहेत. ५ हजार ७१७ पदासाठी उमेदवारांची शिफारस आली नसल्याची बाब समोर आली आहे. ही पदे टप्याटप्याने फेरीनिहाय भरण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 


शिक्षक भरतीसाठी उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यानुसार मुलाखतीशिवाय पद भरतीसाठी १ : १ या प्रमाणात उमेदवार देण्यासाठी व्यवस्थापन निहाय त्यांच्या जाहिरातीतील पदे  विचारात घेऊन गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. १५ टक्के राखीव असलेल्या  माजी सैनिक वर्गाचे उमेदवार नसल्यामुळे २३५७ जागा आणि १० टक्के राखीव असलेल्या अंशकालीन वर्गाचे उमेदवार नसल्यामुळे १५३६ जागा, तसेच खेळाडू (५ टक्के) उमेदवार नसल्यामुळे ५६८ जागा रिक्त राहिल्या आहेत. अशा एकूण ४,४६१ जागा रिक्त आहेत.


----------------------------------------------------


मुलाखतीसह निवडीत १: ३ ऐवजी १० उमेदवार


शिक्षक भरतीच्या मुलाखतीसह याप्रकारातील ४ हजार ८७९ जागा असून, त्यासाठी शिफारस करण्याची प्रक्रियासुरू आहे. उच्च न्यायालयाच्या आदेश तसेच महाराष्ट्र खासगी शाळा नियमावली सन १९८१ च्या प्रचलित तरतुदीनुसार खासगी शैक्षणिक संस्थांना १:३ ऐवजी १:१० या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

------



            भरतीचा पहिला टप्पा पूर्ण 

 शिक्षक भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, ११ हजारांपेक्षा जास्त पदे भरण्यात आली आहेत. उर्वरित रिक्त जागांसाठी पुढील टप्यात उमेदवारांची नियुक्ती  केली जाणार आहे . 

             -  सूरज मांढरे, 
                  आयुक्त

        शालेय शिक्षण विभाग