छत्रपतींच्या गादीचा मान खासदारकी पेक्षा मोठा आहे.

Kolhapur news
By -

 

कोल्हापूर न्यूज  / वि .रा भोसले, ज्येष्ठ पत्रकार


फक्त महाराष्ट्रच काय पण सारा भारत देश शिवछत्रपतींची प्रेरणा घेऊन उभा राहिला आहे , कारण स्वातंत्र्याची पहिली तेजस्वी ज्योत त्यांनीच पेटवली होती.

    छत्रपतींच्या दोन गाद्या .

   कोल्हापूर आणि सातारा.

   दोन्हींचे वारसदार राजकारणात उतरले आहेत.खासदारकी फक्त पाच वर्षांची. गादी मात्र अनंताची असते. 

    साताऱ्यातून छ्त्रपती घराण्याने मुंबई आणि दिल्लीची वैधानिक पदे मिळवली , सत्ता भोगली पण मान सन्मान किती मिळाला .

     छत्रपतींच्या या दोन गाद्या सोडून अनेक संस्थानिकांनी राजकारणात प्रवेश केला आहे.इंदूरचे होळकर ,ग्वाल्हेरचे शिंदे हे आर्थिकदृष्ट्या सातारा कोल्हापूर पेक्षा कितीतरी मोठे आहेत, पण आजही ते छत्रपतींच्या गादीला मुजरा करतात.

     उदाहरणच द्यायचे तर सोनिया गांधी यांनी ग्वाल्हेरचे ज्योतिरादित्य शिंदे व सातारचे उदयन राजे यांना दिल्लीत बोलावले होते.गांधी घराण्याचा व पर्यायाने काँग्रेसचाही त्यावेळी बोलबाला होता.

    ज्योतिरादित्य आधी पोहचले. थोड्या अवधीने उदयनराजे पोहचले .उदयनराजे येताच ज्योतिरादित्य यांनी उभे राहून उदयनराजेंना मुजरा केला.सोनिया गांधी बघतच राहिल्या.त्यांना कांहीं कळेना. दोघांची भेट जेंव्हा होते तेंव्हा हस्तांदोलन करतात. ब्रिटिशांनी पाडलेला शिरस्ता  आजही सर्वत्र पहायला मिळतो. त्रिवार मुजरा सोनियांनी पहिल्यांदाच पाहिला.

  ज्योतिरादित्य यांनी मग सांगितले की , ते आमचे छ्त्रपती आहेत.आम्हीं त्यांचे सेवक सरदार आहोत.

     एवढे एकच उदाहरण पुरेसे आहे.

  छत्रपतींच्या गादीचा मान खासदारकी पेक्षा मोठा आहे.

   कोल्हापुच्या गादीचे वारसदार असलेले सध्याचे वारस शाहू महाराज हे काँग्रेस मार्फत खासदारकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जाते.त्यांच्या विरोधात दुसरे एक दोन उमेदवार निश्चित उभे रहाणार.निवडणूक प्रचारात उलट सुलट भाषणे होणार.तेथे गादीचा सन्मान असेल पण व्यक्तीचा सन्मान रहाणार नाही.गुणदोष दाखवले जातील.

    दखल घेण्यासारखी बाब म्हणजे गादीला थेट वारस कोणीही नाही.सगळे दत्तक वारस आहेत.छत्रपतींच्या या गादीला राजाराम महाराजांच्या (इतिहासातील)नंतर रक्ताचे वारस लाभलेच नाहीत.

  अलीकडच्या काळात गादीचा वारस  निवडतांना कांहीं वाद सुध्दा झाल्याचे करवीरकरांना माहिती आहेतच.पद्माराजे यांनाच वारसा हक्काने गादी मिळाली. पद्माराजे सहाय्यक समिती सुध्दा स्थापन झाली होती .मेजर निंबाळकर हे त्या समितीचे अध्यक्ष होते.त्यावेळी बाळासाहेब देसाई हे गृहमंत्री होते.त्यांच्याच आदेशाने वारसा हक्काचा प्रश्न मिटला .पद्माराजे यांचा विवाह झाला व त्यांनी कोल्हापूर कायमचे सोडले.

    निवडणूक प्रचारात या सर्व घटनांचा जागोजागी उल्लेख होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

   'राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो व कोण कोणाचा मित्र नसतो.'

    हे अलिखित विधान प्रचारात आपला प्रभाव पाडणारच.जय पराजय या नंतरच्या गोष्टी आहेत.

    यातील शत्रू आणि मित्र हे शिवछत्रपतींच्या गादीला मुजराच करतील पण व्यक्तीला तो सन्मान मिळेलच असे नाही. 

    कारण छत्रपतींची गादी ही खासदारकी पेक्षा मोठी आहे.