जागतिक कुस्ती स्पर्धेत मुरगूडच्या अमृता पुजारीची रौप्यपदकाला गवसणी.

Kolhapur news
By -

 


             



                      कोल्हापूर न्यूज नेटवर्क



अमेरिकेतील लास वेगास येथे पार पडलेल्या २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या ७२ किलो वजनगटाच्या अंतिम फेरीत मजल मारत मुरगूडच्या लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय (SAI) कुस्ती संकुलातील डबल महिला महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी हिने रौप्यपदक पटकावलं.


मुरगूडसारख्या खेडेगावात सराव करून जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारणं, ही केवळ अमृताच्या वैयक्तिक यशाची कहाणी नाही; तर कोल्हापूरच्या मातीत रुजलेल्या कुस्तीच्या परंपरेची, कठोर परिश्रमांची आणि दुर्दम्य इच्छाशक्तीची गौरवगाथा आहे!

    इच्छाशक्ती आणि जिद्द यांच्या जोरावर अशक्यप्राय यश मिळवता येते हे अमृताने या स्पर्धेतून दाखवून दिले. 


अमृताला जागतिक स्पर्धेसाठी तयार करण्यात आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक दादासो लवटे, NIS कुस्ती प्रशिक्षक नंदिनी साळोखे, दयानंद खतकर, तसेच संकुलात तिच्यासोबत सराव करणाऱ्या सर्व मुलींचं आणि आर्थिक मदत करणाऱ्या रुबिक्स फाउंडेशनचं योगदान मोलाचं ठरलं. या सर्वांच्या मेहनतीचा आणि प्रेरणेचा सुद्धा हा गौरव आहे.


अमृताच्या या ऐतिहासिक यशाबद्दल तिचं आणि तिच्या मार्गदर्शकांचं अभिनंदन करत माजी खासदार संजयदादा मंडलिक यांनी बांधकाम सुरू असलेलं इनडोअर स्टेडियम लवकरच पूर्ण करून मुलींना अत्याधुनिक सुविधांसह सरावासाठी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.


अमृताच्या जागतिक रौप्यपदकामुळे महाराष्ट्रातील अनेक मुलींना कुस्ती क्षेत्रात येण्याची आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं प्रतिनिधित्व करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास ॲड. विरेंद्र  मंडलिक यांनी व्यक्त करून अमृताला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


यावेळी संकुलाचे कार्यवाह आण्णासो थोरवत, SAI चे माजी राज्य समन्वयक चंद्रकांत चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी उपायुक्त सुनील चव्हाण आणि डॉ. प्रशांत अथनी यांनीही अमृताचं अभिनंदन करून तिच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 


              ---------------------------