शेतकऱ्यांचे महामार्ग रोको आंदोलन २८ तासानंतर मागे ; आता केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानावर काढणार पायी मोर्चा

Kolhapur news
By -

 

                             


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क



 उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर मिळावा, साखरेचा किमान विक्री दर प्रतिकिलो ५० रुपये करावा आणि इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये करावा, अशा प्रमुख मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. या मागण्यांवर केंद्र सरकारसोबत झालेल्या चर्चेत ठोस तोडगा न निघाल्याने आंदोलन तीव्र करण्यात आले होते.


 कोगनोळी व हत्तरगी येथे सुरू असलेल्या महामार्ग रोकोमुळे पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागला. आता महामार्गावरील ठिय्या मागे घेतल्याने वाहतूक पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे.



आंदोलनाच्या पुढील टप्प्यात शेतकरी काकती येथे मुक्काम करून बेळगावमार्गे हिरेबागेवाडी येथे जाणार आहेत. त्यानंतर हुबळीकडे पायी मोर्चा काढून केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानावर धडक देण्याचे नियोजन आहे.


दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी ऊसदराच्या प्रश्नावर भूमिका मांडली आहे. ऊस उत्पादकांना योग्य दर मिळावा, साखरेच्या किमान विक्री दरात वाढ व्हावी आणि इथेनॉलच्या दरात सुधारणा व्हावी, या मागण्यांवर शेतकरी संघटना ठाम आहेत.


महामार्गावरील आंदोलन मागे घेण्यात आले असले, तरी मागण्यांवर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे पायी मोर्चाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ऊसदरवाढीच्या मागण्यांवर केंद्र सरकार काय भूमिका घेते, याकडे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.


या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होत निपाणी वकील संघटनेने  शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत शासनाचा निषेध केला.


शेतकऱ्यांवरील दाखल झालेले खटले मोफत लढणार आहोत. निपाणी वकील संघटनेचे अध्यक्ष  संजय वैराट यांनी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर शासन किंवा प्रशासनाकडून जे काही कायदेशीर खटले दाखल केले जातील, ते सर्व खटले निपाणी बार असोसिएशनचे वकील न्यायालयात पूर्णपणे मोफत लढणार आहेत. आंदोलनस्थळी येणारे नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी वकील संघटनेतर्फे मोफत जेवणाची केली जाणार असल्याचे सांगितले.


       -------------------------