कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले
गोकुळच्या गेल्या निवडणुकीत 'आमचं ठरलंय 'ही बिरूदावली जणू काही संघाच्या मस्तकीचा टिळा ठरली होती. मनपा ची (महाडिक, नरके, पाटील ) 25वर्षांची गोकुळ वरची सत्ता उलथवून ना.हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी 'आमचं ठरलंय' असं 'म्हणत हा हा म्हणता गोकुळ संघ ताब्यात घेतला आणि चांगला चालवला सुद्धा.विरोधात फक्त एक वाघीण शौमिका महाडिक.
या वेळेला मात्र दोघे एकमेकांच्या विरोधात आहेत. प्रश्न दोघांच्याही प्रतिष्ठेचा आहे. याही वेळी सुद्धा ते म्हणतात
आमचं ठरलंय. चिन्ह ठरलंय. मैदानात उतरून दूध उत्पादकांसाठी लढायचं ठरलंय. एक गोष्ट इथं. लक्षात घ्यायला हवी की दोघेही योद्धे आहेत. दोघांची ही नाळ सर्व सामान्य कष्टाळू उत्पादकांशी जोडली गेलेली आहे. अंदाजे पाच लाख उत्पादकांचे पाच हजार ठराव धारक आहेत. चंद्रकांत दादा म्हणत होते.5पैकी 4हजार ठराव युतीचे आहेत. तसं नाही दादा.हॆ कोल्हापूर आहे. पुणे मुंबई नाही.
सतेज पाटलांनी वयस्कर शाहू छत्रपतीना वाड्यातून आणून खासदार केले. त्यावेळी तुमचे सगळे तरुण एक्के पाण्यात भिजले. यावेळी ठराव धारकांची संख्या मोजण्या पेक्षा ते ठराव धारक नेत्यांसाठी मतदान करणार आहेत की दूध उत्पादकांच्या हितासाठी मतदान करणार आहेत हे मोजलं पाहिजे. तेंव्हा 25 : 0 सत्ता कोणालाही मिळेल असं वाटत नाही.तशी परिस्थिती आहे.
त्याला कारणं ही तशीच आहेत.
मागच्या वेळेला सत्ता बदल झाला तेंव्हा सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर तो गोकुळचे संस्थापक स्व. आनंदराव पाटील चुयेकर यांना. स्वर्गात सुद्धा त्यांनी त्यावेळी एक दिवा लावून आनंद साजरा केला असेल. ते पहाटेपासून गायी म्हशी च्या गोठ्यातून फिरायचे. दूध उत्पादकांच्या समस्या काय काय आहेत ते समजून घ्यायचे.A.C. त बसून विकासाचे गणित कागदावर सोडवत नव्हते.नंतर संघाचे लोकशाहीकरण झाले तेंव्हा ते धास्तावले.तेव्हा दिवंगत खासदार बाळासाहेब माने आणि खासदार उदयसिंगराव गायकवाड यांनी त्यांना सत्तेची कसलीही अपेक्षा न ठेवता साथ दिली.
आता तशी परिस्थिती नाही.गोकुळचा संचालक आमदाराला भारी असतो असे मानले जाते.त्यामुळे ताक ढवळून लोणी काढतात तसे गोकुळ चे राजकारण ढवळून निघाले आहे.केस पिकलेले,साठी गाठलेले वयस्कर आणि तिशीतले Gen Z वाले सुद्धा उमेदवार आहेत.कपातला चहा बशीत ओतून थंड करून पिणारे आणि शिट्टी वाजवत कढत चहा फुंकून पिणारे असे दोन्ही प्रकारचे उमेदवार आहेत.
चिंता एवढीच की 4 हजार कोटींच्या या संघाचा लाभ जसा पुण्या मुंबईतील 30 व्या 31,व्या अशा उंच मजल्यावर राहणाऱ्या गर्भ श्रीमंत नागरिकांना होतो तसा चिखलात, शेणात आणि वैरणीत पाय बरबटून घेऊन दुधाच्या धारा काढणाऱ्या आया बहिणींना आणि भावांना सुद्धा व्हावा.कोल्हापूरचे ठराव धारक ते ठरवणार आहेत. आणि तसं नाही घडलं तर गोठ्यातले दूध डांबरी रस्त्यावर सुद्धा ओतून द्यायला उत्पादक डगमगणार नाही. कारण तो कोल्हापूरचा आहे.
------------------------

