कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूडच्या आई अंबाबाईचे निस्सीम भक्त विश्वनाथ दत्तात्रय गुरव यांचे 2 ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंती दिवशी निधन झाले. गांधींना त्यांनी कधि पाहिलं नव्हतं.त्यांचा स्वातंत्र्य लढ्याचा ओजस्वी इतिहास मात्र त्यांनी वाचला होता. मुरगूड सुद्धा स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांची भूमि आहे. तोही इतिहास त्यांनी ऐकला होता.देवीची पूजा करता करता आपणही समाजकार्यात स्वतःला झोकून द्यावे असे त्यांना वाटले.
युवकांच्यावर चांगले संस्कार झाले पाहिजेत म्हणून त्यांनी रामायण, महाभारत, शिव छत्रपतींचा इतिहास यातून प्रेरणा घेऊन आंबाबाई लेझीम पथकाची स्थापना केली. शेकडो युवक त्यात सामील झाले.ते व्यसनां पासून दूर राहावेत म्हणून मर्दानी खेळांना प्रीत्साहन दिले.शिवरायांच्या गड कोटांची भ्रमंती मोहीम सुरु केली.
ते स्वतः विविध कलांचे उपासक होते. मृदूंग तबला, हार्मोनियम, माऊथ ऑर्गन, बासरी वादन इत्यादी कला त्यांनी आत्मसात केल्या. त्या कलांचा उपयोग करून त्यांनी नवरात्र उत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमाना प्रोत्साहन दिले. त्यात हालगी वादन स्पर्धा, लेझीम स्पर्धा, महिलांच्या झिम्मा फुगडी स्पर्धा,रांगोळी स्पर्धा सुरू केल्या. त्यांचे आयोजन व परीक्षण यासाठी परिश्रम घेतले.
वारकरी संप्रदायातून त्यांनी संत कबीर कार्तिक वारी सुरू केली. विठ्ठल मंदिरातील भजन कीर्तन आणि सांस्कृतिक उत्सवात पुढाकार घेतला.समाजसेवा हाच त्यांचा पिंड होता.एवढ्यावर ते थांबले नाहीत शेतकरीवर्ग शेतीच्या पाण्याअ भावी खुप त्रस्त झाला होता. माळरानातील पिकांना पाणी देता यावे म्हणून त्यांनी दत्त मंदिर ते शिवराज विद्यालय पाईपलाईन काढून शेतकऱ्यांना दिलासा दिला.
विविध सद्गुणांनी युक्त असलेले हे सामाजिक व्यक्तिमत्व गांधींजयंती दिवशीच अनंतात विलीन झाले. असंख्य युवकांना, महिला भगिनींना, वारकरी बांधवाना आपल्या घरचंच कोणी गेल्यासारखं अपरिमित दुःख झालं.
मुरगूडच्या सांस्कृतिक परंपरेच्या मुकुटातील एक हिरा निखळला.मुरगूड करांनी या समाज सुधारकाला कृतज्ञतेचा सलाम केला.
----------------------


