कोल्हापूर न्यूज नेटवर्क
भारतीय चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेता, आपल्या अस्सल संवादफेकीने लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आणि पडद्याबाहेरही माणुसकी जपणारे नाना पाटेकर आज आपल्यात नाहीत. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने केवळ एक ज्येष्ठ अभिनेता गमावला नाही, तर साधेपणाने जगणारा आणि गरजूंना आधार देणारा एक संवेदनशील माणूसही गमावला आहे.
नानांच्या कारकिर्दीच्या असंख्य आठवणी देशभर विखुरलेल्या आहेत. मात्र कोल्हापूरशी जोडलेल्या त्यांच्या काही आठवणी आज विशेषत्वाने आठवतात. कागलच्या भूमीवर नानांचे झालेले आगमन, हसन मुश्रीफ यांच्याशी असलेला जिव्हाळा आणि कोल्हापुरातील एका गरजू रुग्णाला मिळालेली मदत या घटना त्यांच्या कोल्हापूरशी असलेल्या वेगळ्या ऋणानुबंधाची साक्ष देतात.
‘हसन माझा जवळचा दोस्त आहे रे…’
जून २०२२ मध्ये कागल येथे महापुरुषांच्या पुतळ्यांच्या अनावरण कार्यक्रमासाठी नाना पाटेकर आले होते. त्यावेळी नाना कोल्हापुरात मुक्कामी होते. नाना शहरात आल्याचे समजताच तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ त्यांची भेट घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेले.मुश्रीफ येत असल्याचे समजताच नाना स्वतः खोलीबाहेर आले. दोघांची भेट झाली आणि नानांनी मुश्रीफांना आपुलकीने मिठी मारली. “अरे तू इकडे कशाला आलास? मीच तुला भेटायला तुझ्याकडे येणार होतो,” अशा शब्दांत नानांनी आपली आपुलकी व्यक्त केली.नानांनी मुश्रीफांना एकेरी हाक मारल्याने सोबतचे काही कार्यकर्ते क्षणभर आश्चर्यचकित झाले. मात्र नानांनीच हसत स्पष्ट केले—“हसन माझा जवळचा दोस्त आहे रे, गैरसमज करून घेऊ नका.” या छोट्याशा प्रसंगातून नानांच्या व्यक्तिमत्त्वातील मोकळेपणा आणि माणसांशी असलेली जवळीक दिसून आली.
कागलमधील सार्वजनिक कार्यक्रमात नानांनी आपल्या खास शैलीत संवाद साधला. महापुरुषांचे पुतळे उभारणे महत्त्वाचे असले तरी त्यांच्या विचारांचा अंगीकार करणे अधिक महत्त्वाचे असल्याचा संदेश त्यांनी दिला.कार्यक्रमातील त्यांच्या मिश्कील शैलीने वातावरणात हास्य फुलले; पण त्यामागे सामाजिक बांधिलकीचा सूरही स्पष्ट होता. नाना पाटेकर हे केवळ संवादफेकीसाठी प्रसिद्ध नव्हते, तर सामाजिक प्रश्नांवर स्पष्टपणे बोलणारे कलाकार म्हणूनही त्यांची ओळख होती.
नानांच्या कोल्हापूरशी जोडलेल्या आठवणींपैकी आणखी एक महत्त्वाची आठवण म्हणजे शेखर कुलकर्णी यांच्या उपचारासाठी केलेली मदत.अपघातामुळे शेखर कुलकर्णी यांच्या पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचारासाठी मोठ्या खर्चाची आवश्यकता होती. मदतीसाठी प्रयत्न सुरू असताना ही माहिती नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम’ फाउंडेशनपर्यंत पोहोचली.
त्यानंतर ‘नाम’च्या माध्यमातून उपचारासाठी दीड लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. या मदतीमुळे शेखर कुलकर्णी यांच्या उपचारांना मोठा हातभार लागला.
नानांनी केलेल्या अशा अनेक मदतीची फारशी प्रसिद्धी झाली नाही. कदाचित म्हणूनच त्यांचा ‘कलाकार’ म्हणून जितका गौरव झाला, तितकाच ‘माणूस’ म्हणूनही त्यांचा आदर महाराष्ट्राच्या मनात निर्माण झाला.
नाना पाटेकर यांचे चित्रपट, त्यांचे संवाद आणि त्यांच्या भूमिका काळाच्या पडद्यावर कायम राहतील. पण कोल्हापूरसाठी नानांची आठवण केवळ ‘नटसम्राट’ किंवा ‘क्रांतिवीर’पुरती मर्यादित नाही.
कागलच्या व्यासपीठावर मनमोकळेपणाने बोलणारा नाना, हसन मुश्रीफ यांना मित्राच्या नात्याने मिठी मारणारा नाना आणि संकटात सापडलेल्या एका कुटुंबाच्या मदतीला धावून जाणारा नाना—या आठवणींचा नाना कोल्हापूरच्या मनात वेगळ्या जागी राहील.
कलाकार अनेक येतात आणि जातात. काहींची नावे काळाच्या ओघात विसरली जातात. मात्र ज्यांच्या कलेसोबत त्यांच्या माणुसकीच्या आठवणीही जिवंत राहतात, त्यांना काळ कधीच पुसू शकत नाही.
नानांचा आवाज आता शांत झाला असेल; पण त्यांच्या अभिनयाचा ठसा आणि माणुसकीच्या आठवणी महाराष्ट्राच्या मनात कायम घुमत राहतील.
नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
------------------------


