कन्या महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

Kolhapur news
By -

 

            


                      कोल्हापूर न्यूज नेटवर्क



श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी येथे मराठी विभागाच्या वतीने दि. ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अभिजात मराठी भाषा सप्ताह विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.


       मराठी भाषेचा समृद्ध साहित्यिक वारसा, भाषेचे सौंदर्य आणि अभिजात परंपरेची ओळख विद्यार्थिनींना व्हावी, तसेच त्यांच्यातील भाषिक कौशल्ये व सर्जनशील अभिव्यक्तीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने सप्ताहांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, शुद्धलेखन स्पर्धा आणि अभिवाचन स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धांमुळे विद्यार्थिनींना आपल्या विचारांची प्रभावी मांडणी करण्याची, भाषेवरील प्रभुत्व सिद्ध करण्याची आणि साहित्यिक अभिरुची विकसित करण्याची संधी मिळाली.


       सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी प्रसिद्ध लेखिका विमल मोरे यांनी ‘माझा साहित्यिक प्रवास’ या विषयावर व्याख्यान दिले. आपल्या साहित्यिक प्रवासातील अनुभव कथन करत त्यांनी लेखनाची प्रेरणा,  आणि साहित्याच्या माध्यमातून व्यक्त होणारे जीवनानुभव यांविषयी मार्गदर्शन केले. 


       तसेच ऋषीप्रसाद डोंगरे यांनी अभिवाचन आणि अभिनय या विषयांवर विद्यार्थिनींना कृतीयुक्त मार्गदर्शन केले. अभिवाचन करताना आवाजातील चढ-उतार, शब्दोच्चार, भावाभिव्यक्ती, देहबोली आणि सादरीकरणातील बारकावे त्यांनी प्रात्यक्षिकांसह समजावून सांगितले. 


      सप्ताहाच्या माध्यमातून विद्यार्थिनींमध्ये मराठी भाषेविषयी प्रेम, अभिमान आणि जिव्हाळा निर्माण करण्याबरोबरच वाचन, लेखन, वक्तृत्व आणि अभिवाचन या कौशल्यांना चालना मिळाली. विविध स्पर्धा आणि मार्गदर्शनपर कार्यक्रमांना विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 


        अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे नियोजन व आयोजन  मराठी विभागप्रमुख डॉ. अनिता आंबोकर, प्रा. रोहिणी रेळेकर, प्रा. प्रतिभा पैलवान यांनी  केले. प्रा. संगीता पाटील, प्रा. प्रमिला सुर्वे, प्रा. स्वाती हळवणकर डॉ. सोमनाथ काळे व डॉ. निशा सुर्वे यांबरोबर अन्य प्राध्यापक रुंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी  महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. श्रुती जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.


                  -------------------------