कोल्हापूर न्यूज नेटवर्क
‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’, ‘गाव तिथे शाळा व वर्ग तिथे शिक्षक’ आणि ‘ऑनलाइन कामे थांबवा, आम्हाला शिकवू द्या’ अशा घोषणा देत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा कागल यांच्या वतीने कागल पंचायत समितीसमोर आयोजित करण्यात आलेले एकदिवसीय धरणे आंदोलन उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले.
या आंदोलनातून शाळांचे अस्तित्व टिकविण्यासह विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क आणि शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
राज्यातील कोणतीही शाळा पटसंख्येअभावी बंद होऊ नये, १५ मार्च २०२८ रोजीचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करण्यात यावा आणि शिक्षकांवरील ऑनलाइन कामांचा वाढता भार थांबविण्यात यावा, या प्रमुख मागण्या आंदोलनातून मांडण्यात आल्या.
ग्रामीण भागातील तसेच बहुजन समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांचे शिक्षण अखंडित सुरू राहावे, ही आंदोलनामागील प्रमुख भूमिका होती. शिक्षकांसह विविध घटकांचा सहभाग हाेता.
या आंदोलनाला शिक्षक-शिक्षिका, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, पालक तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शाळा टिकल्या तरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या गावात शिक्षणाची संधी उपलब्ध राहील. त्यामुळे शाळा बंद होण्याच्या प्रश्नाकडे केवळ प्रशासकीय बाब म्हणून न पाहता विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भविष्याशी संबंधित महत्त्वाचा विषय म्हणून पाहण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.
शिक्षकांवर अध्यापनाव्यतिरिक्त विविध ऑनलाइन कामांचा वाढता भार असल्याने विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, अशी अपेक्षाही आंदोलनातून व्यक्त करण्यात आली. शिक्षकांना अध्यापनासाठी अनुकूल वातावरण मिळावे आणि शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
शिक्षणाच्या न्याय्य प्रश्नांसाठी लढा सुरूच राहणार
शिक्षणव्यवस्थेतील प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षकांची एकजूट आणि समाजाचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित, शाळांचे अस्तित्व आणि शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटनेचा लढा यापुढेही सुरू राहील, असा निर्धार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा कागल यांच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
शाळा वाचविणे म्हणजे विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करणे, या भूमिकेतून आंदोलनाने शिक्षणाच्या प्रश्नांवर एकत्रितपणे आवाज उठविण्याचा संदेश दिला.
या आंदोलनाचे नेतृत्व शिक्षक समितीचे कागल तालुकाध्यक्ष अरविंद पाटील यांनी केले. यावेळी एल. एस. पाच्छापुरे, संतोष मेगाणे, काकासो पाटील, सुकुमार पाटील, रमेश काबळे, के. बी. चौगुले आणि सदानंद यादव यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शिक्षक समितीचे सरचिटणीस श्रीकांत गायकवाड, बा. ना. चव्हाण, डी. एम. कुंभार, पंडित भुरले, तानाजी तारदाळे, ओमाजी काबळे, अशोक मगर, विजया खोत, नंदिनी घाटगे, तेजस्विनी पाटील, शैलजा चिखलीकर, सुप्रिया पाटील, सुजाता पाटील, युवराज सातुसे, सचिन पाटील, संदीप शारबिद्रे, सागर डवरी, युवराज पोवार, शशिकांत कुंभार, सचिन जाधव, विठ्ठल वडर आणि सदानंद कांबळे यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते. तसेच विविध शाळांच्या व्यवस्थापन समित्यांचे पदाधिकारी आणि बहुसंख्य शिक्षकांनी आंदोलनात सहभाग घेतला.
‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ हा केवळ घोषवाक्याचा विषय नसून ग्रामीण भागातील प्रत्येक बालकाच्या शैक्षणिक भवितव्याशी निगडित प्रश्न आहे. प्रत्येक गावात शाळा, प्रत्येक वर्गात शिक्षक आणि प्रत्येक शिक्षकाला अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी शिक्षक समिती कागलच्या वतीने हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
--------------------

