कोल्हापूर न्यूज नेटवर्क
ज्ञान आणि चारित्र्य याचा सुरेख संगम म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. डॉ. आंबेडकरांच्या मुळेच वंचित उपेक्षितांना मोकळा श्वास घेण्याची हमी मिळाली. बाबासाहेबांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक परिघात अमूल्य योगदान दिले असून भारतीय संविधान हे त्यांनी देशाला दिलेले सर्वोत्तम दान आहे, असे प्रतिपादन
डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रा.सुकुमार कांबळे यांनी केले.
नानीबाई चिखली येथील पंचशील तरुण मंडळाच्यावतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जंयतीनिमित्त 'फुले शाहू आंबेडकर आणि धम्म चळवळ' या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
आजच्या तरुणांना उद्देशून बोलताना ते म्हणाले , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे सूत्र ग्रंथ होते. ते सातत्याने ग्रंथांमध्ये रममाण असायचे. या ग्रंथांचा अफाट संग्रह आणि वाचनातूनच त्यांनी केलेल्या लेखन व कार्यामुळे भारतात प्रबोधनाची पहाट निर्माण झाली. शिक्षणाचा, समतेचा विचार मांडणाऱ्या बाबासाहेब यांच्या विचारांचा आज अनेक विद्यापीठांत अभ्यास होतो ही गोष्ट तरुणांसाठी खूप प्रेरणादायी आहे. प्रारंभी डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन त्यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. सुकुमार कांबळे सरांचा सत्कार सरपंच अल्लाबक्ष सय्यद ,निसर्ग मित्र महादेव कांबळे आदींच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास पंचशीलनगर मधील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .
पंचशील तरुण मंडळाने जयंती निमित्त आयोजित सर्व कार्यक्रमाचे संयोजन केले .



