कोल्हापूर न्यूज नेटवर्क
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आमच्यावर अन्याय होत आहे, आम्हाला सन्मान मिळत नाही, आमच्याकडे दुर्लक्ष केले जाते, आम्हाला कोणत्याही कार्यक्रमाला बोलवत नाहीत, आमच्या जीवावर निवडून येतात, श्रेय मात्र दुसऱ्यांना देतात अशी थेट तक्रार धनंजय महाडिक युवाशक्तीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्यासमोर केली.
कागल विधानसभा मतदारसंघातील महाडिक युवाशक्तीचे कार्यकर्ते आज अचानक खासदार महाडिक यांच्या कार्यालयात आले. तेथे त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मुश्रीफ यांच्या विरोधात त्यांनी अन्यायाचा पाढा वाचला. असे होत असेल तर आम्ही का त्यांचा प्रचार करायचा? असा सवालच त्यांनी केला.
पालकमंत्री मुश्रीफ हे महायुतीचे संभाव्य उमेदवार असल्याने कोणत्याही परिस्थितीत वेगळा विचार करू नका, अन्याय होत असेल, काही तक्रार असतील तर मी हिमालयासारखा तुमच्या सोबत आहे, माझ्याकडे या अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी त्यांना दिली.