कोल्हापूर न्यूज नेटवर्क
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन केले. याप्रसंगी त्यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय, शिक्षण आणि समानतेसाठी केलेल्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या योगदानाला आदरांजली वाहिली. तसेच समाधीस्थळी पुष्प अर्पण करून नतमस्तक होत शाहू महाराजांच्या कार्याचा गौरवही केला.
या वेळी शाहू महाराज छत्रपती, मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसाठी नियुक्त न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती शिवकुमार दिगे, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर, पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता कोल्हापूर यांच्यासह प्रशासनातील इतर अधिकारी, न्यायालयीन अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
राजर्षी शाहू महाराजांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी शिक्षणाची दारे खुली करून सामाजिक प्रबोधनाचा मार्ग दाखवला. त्यांच्या कार्यातून आजच्या न्यायव्यवस्थेलाही प्रेरणा मिळते. शाहू महाराजांचे न्यायप्रक्रियेतील योगदान ‘सर्वांना समान न्याय’ या तत्त्वावर आधारित होते. त्यांनी सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक भेदभाव दूर करून न्यायव्यवस्थेला अधिक समावेशक आणि मानवीय बनवले. त्यांचे हे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या समाजसुधारकांना प्रेरणा देणारे ठरले आणि आजही सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात दिशादर्शक आहे. उद्या, दि. १७ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे.
-------------------