शुक्रवारी कोल्हापूर विभाग व जिल्ह्याचा संयुक्त उल्लास मेळावा.

Kolhapur news
By -

 

         


                   कोल्हापूर न्यूज नेटवर्क


        केंद्रशासन पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत ६ डिसेंबर २०२४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूल पेठ वडगाव येथे कोल्हापूर विभाग व कोल्हापूर जिल्हास्तर अशा संयुक्त उल्लास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या उल्लास मेळाव्याच्या धर्तीवर हा मेळावा होणार असून कोल्हापूर शैक्षणिक विभागातील पाचही जिल्ह्यातील अधिकारी, नवसाक्षर,असाक्षर स्वयंसेवक या मेळाव्यात सहभागी होणार आहेत,अशी माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी दिली.


या मेळाव्यामध्ये साक्षरते संबंधी विविध विषयांचे ६० स्टॉल मांडण्यात  येणार आहेत. त्यात माझे कुटुंब , शेजार, नातेसंबंध, मतदान प्रक्रिया, ईव्हीएम मशीन, दैनंदिन व्यवहार, वित्तीय साक्षरता, एटीएम, पासबुक, बाळाची निगा - वजन, उंची, लसीकरण, आहार , पायाभूत व डिजिटल साक्षरता, वाहतुकीचे नियम, संवाद माध्यमे अशा विषयांचा संदर्भात माहिती दिली जाणार आहे. याच विषयांवर आधारित कोल्हापूर विभागातील कोल्हापूरसह सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. या योजनेअंतर्गत आजपर्यंतच्या अंमलबजावणीची माहिती देणारे जिल्ह्यांचे तसेच विभागाअंतर्गत जिल्ह्यातील तालुक्यांचे आणि मनपा यांचे उल्लास विशेषांक पाहायला मिळणार आहेत. तसेच नवसाक्षर व स्वयंसेवक यांचे मनोगत घेण्यात येणार असून त्यांच्या चर्चासत्राचेही आयोजन करण्यात आले आहे . 


या मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य योजना शिक्षण संचालक डॉ.महेश पालकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, कोल्हापूरचे प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेय ,सांगली, सातारा ,रत्नागिरी ,सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्याचे डायट प्राचार्य, प्राथमिक, माध्यमिक व योजना शिक्षणाधिकारी , कोल्हापूर विभाग व  जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी प्रशासनाधिकारी व शिक्षक उपस्थित राहणार आहेत. 


या उल्लास मेळाव्याच्या आयोजनाबाबत कोल्हापूर विभागाचे विभागीय उपसंचालक महेश चोथे, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था कोल्हापूरचे प्राचार्य डॉ.राजेंद्र भोई आणि योजना शिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे यांनी आवश्यक पूर्वतयारी केली आहे. शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर आणि विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याची तयारी करण्यात आली असून डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल यांनी उत्कृष्ट नियोजन केले आहे . 


सन २०२७ अखेर देशभरात पाच कोटी लोकांना साक्षर करण्याचे उदिष्ट पूर्ण करायचे आहे, त्यादृष्टीने राज्य, विभाग, जिल्हा, तालुका व शाळा स्तरावर  असाक्षरांच्या नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले असून स्वयंसेवकांबरोबर त्यांची जोडणी करून त्यांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नियामक तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. उल्लास मेळाव्यात नवसाक्षर, स्वयंसेवक आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा प्रतिनिधीक सत्कार करण्यात येणार आहे.

         ----------------------------------


  कोल्हापूर विभाग व जिल्हा संयुक्त मेळाव्यानंतर विभागाअंतर्गत उर्वरित चार जिल्हास्तरीय मेळावे आणि त्यानंतर तालुकास्तरीय मेळावे घेण्यात येणार आहेत. सर्व क्षेत्रीय यंत्रणांना उल्लास कार्यक्रमाची सर्वंकष माहिती यानिमित्त होईल. या विभागांतर्गत उल्लास योजनेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न सुरू आहेत.

                     -महेश चोथे, 

विभागीय शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर.


     -----------------------------------------------