कोल्हापूर न्यूज नेटवर्क
संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरी होणारी शिवजयंती यंदाही मुरगूडमध्ये मोठ्या दिमाखात साजरी होणार आहे. १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या उत्सवासाठी तयारीला वेग आला आहे. नगरपरिषद इमारतीसमोरील शिवतीर्थ क्षेत्रात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्वच्छता आणि सजावट करण्यात येत आहे.
शिवभक्तांनी घेतला पुढाकार
शहरातील शिवभक्तांनी एकत्र येत पुतळ्याची स्वच्छता केली. पाण्याने धुणे, फिनेल आणि विशेष ब्रशने घासून पुतळ्याचा लखलखाट करण्यात आला. परिसरातील धूळ आणि घाण काढून तेथील वातावरण स्वच्छ आणि पवित्र करण्यात आले.
शिवतीर्थ परिसराचा सौंदर्यीकरण उपक्रम
फक्त पुतळाच नव्हे, तर संपूर्ण शिवतीर्थ परिसराची स्वच्छता आणि सजावट करण्याचा संकल्प शिवभक्तांनी केला आहे. यासाठी फुलांची आरास, विद्युत रोषणाई आणि भगव्या पताका लावण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
उत्सवाचा कार्यक्रम आणि मिरवणूक
शिवजयंती निमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. डोल ताशांच्या गजरात, लेझीम पथक, घोडेस्वार मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. शिवप्रेमींनी भगवे फेटे परिधान करून ‘हर हर महादेव’च्या जयघोषात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहरात उत्साहाचे वातावरण
शिवजयंतीचा सोहळा भव्य आणि उत्साही करण्यासाठी नगरपरिषद, स्थानिक संघटना, आणि तरुण मंडळे एकत्र येऊन नियोजन करत आहेत. नागरिकांमध्येही मोठा उत्साह दिसून येत असून, शिवतीर्थासह संपूर्ण मुरगूड शहर भगव्या रंगात न्हाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण मुरगूड शिवमय होणार असून, प्रत्येक शिवभक्त मोठ्या आनंदाने या सोहळ्यात सहभागी होण्यास सज्ज आहे.
----------------------------------------

