काेल्हापुर न्यूज / वि .रा. भाेसले
मतदार संघातील फाटक्यातला फाटका माणूस हेच आमचे खरे दैवत .त्याचा विकास होईल तेंव्हा आपोआपच सर्वांचा विकास होईल असे उद्गार आरोग्य मंत्री ना.प्रकाश आबिटकर यांनी काढले.
शनिवारी सकाळी त्यांचे आगमन गारगोटी येथे झाल्यावर गर्दीचा महापूर लोटला.युवकांची संख्या अधिक होती.
नंबर नाही,चिठ्ठी नाही. एवढी गर्दी असूनही कसलाही कोलाहल नाही.
मंत्री महोदयांनी खुर्ची सुध्दा बाजूला ठेवली.उठून उभे राहून येईल त्यांचा कागद स्विकारायचा , रिमार्क मारायचा,कोणी फोन लाऊन दिला तर त्या सरकारी अधिकाऱ्यांशी बोलायचे .माझ्याकडे आलेल्या माणसाचे काम थांबू नये.मी सही करून देत आहे.समजून घ्या.
एखादी वृध्द व्यक्ती मध्येच घुसते .बत्तीस पैकी चार सहाच दात शिल्लक असतात,मातीने मळलेले दोन तीन ठिकाणी फाटलेले असतात.शेतातून तसाच आलेला तो एखादा शेतकरी किंवा शेतमजूर असावा.
"मामा या . बरं आहे ना ?
"बरं हायकी .काय झालंय तवा ! .तुम्ही आलासा तवा शेतात हुतो.गाड्या आल्याल्या बघितल्या आणि आलो तसाच बांधावरनं ."
त्या अस्सल ग्रामीण भाषेत जिव्हाळा ठासून भरला होता.तापलेल्या ढेकळावर पहिला पाऊस पडला म्हणजे मातीला जो सुगंध येतो तो मोगरा आणि चाफ्याला सुध्दा मागे सारतो.त्या वृद्ध शेतकऱ्याच्या शब्दांना तसाच सुगंध होता.
मंत्री महोदयांनी त्या शेतकऱ्याला मिठीत घेतलं.पाठीवर थोपटलं, आपुलकीनं चौकशी केली.
मामांच कांहींच काम नव्हतं.त्या भेटीत मात्र भरपूर कांहीं होतं.समोरच्या घोळक्याला सुंदर संदेश गेला.
'साहेब विमानांन आला असला तरी जमीनीच्या मातीशी इमान राखणारा हाय.'
मंत्र्यांना भेटायला लांबून कांहीं कार्यकर्ते नेते,पत्रकार आले होते. त्यातील कोणीतरी चेष्टेत म्हणाले .
"कॅबिनेट मंत्र्यांना भेटायला टोकण घ्यावे लागते की काय असे वाटले होते."
मंत्री महोदय मोठ्यानं हसले.
"मी याच माणसांमधून आलोय . फाटक्यातला फाटका माणूस म्हणजे मला दैवत वाटते."
कसलीही पोझ न देता चेहेऱ्यावर खुललेले नैसर्गिक हास्य ही त्यांची खरी ओळख होती.
रस्त्यावर जागोजागी लावलेल्या मोठाल्या पोस्टर्सवर तोच हासरा चेहेरा झळकताना दिसत होता. पांढऱ्या पोशाखातील निबर चेहेऱ्याचे पुढारी पाहून सवय झालेल्या लोकांना ती पोस्टर्स पाहून खूप हलके वाटत होते.एक प्रकारचा विश्वास वाटत होता. लांबच्या प्रवासात कोणीतरी ओळखीचं भेटलं की जसा आनंद होतो तसा आनंद सामान्य लोकांच्या चेहेऱ्यावर पहायला मिळाला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा फोटो व दोन्ही बाजूस देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांचे फोटो हे महायुतीची ओळख देत असले तरी कमानी वरील भव्य भगव्या धनुष्यबाणां मुळे शिवसेनेचा वेगळा रुबाब पहायला मिळत होता.
जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे सरकारी आभूषण असले तरी सामान्यातल्या सामान्य माणसाला मंत्र्यांच्या व्यक्तित्वात 'आपला पालक ' भेटल्याची अनुभूती यावी हे थोडके नसे
-------------------------------------------

