मुंबई:अभिनेता विकी कौशलचा छावा चित्रपट प्रदर्शित झाला असून सर्वत्र चांगलाच धुमाकूळ घालत असल्याचे दिसत आहे. या चित्रपटावर अनेकांनी उत्तम प्रतिक्रिया दिल्या आहेत. विकी कौशलच्या अभिनयासोबतच लक्ष्मण उतेकर यांच्या दिग्दर्शनाचे देखील तोंडभरून कौतुक होताना दिसत आहे. तसेच दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिकाने या चित्रपटात येसुबाईंची भूमिका केली आहे. या चित्रपटावर अभिनेते शरद पोंक्षे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पोंक्षे म्हणाले, मी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला 'छावा' हा चित्रपट पाहिला. चित्रपट खूपच उत्तम बनवला आहे. प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पाहायला हवा. चित्रपट पाहाताना रक्त खवळते आणि डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत.
पुढे बोलताना शरद पोंक्षे म्हणाले, आपल्या स्वराज्यासाठी, हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या शंभूराजेंनी इतक्या वेदना सहन केल्या आणि त्या नालायक औरंगजेबाने क्रूरतेचा कळस गाठला. लक्ष्मण उतेकर यांनी इतक्या सुंदर पद्धतीने हा चित्रपट शूट केला आहे, की त्यांचे कौतुक करायला हवे. विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका खूपच उत्तमरित्या साकारली आहे. या चित्रपटात जेवढे मराठी कलाकार आहेत, सर्वांनी खूप सुंदर पद्धतीने आपापले काम केले आहे. खूप वर्षांनी एक खूपच उत्कृष्ट ऐतिहासिक चित्रपट पाहायला मिळाला. या चित्रपटाचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे. ए. आर. रहमान यांचे बॅकग्राउंड म्युझिक देखील खूप छान असल्याचे शरद पोंक्षे यांनी सांगितले आहे.
शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटाचे कौतुक केले आहे. औरंगजेब शेवटी आपले धर्मवीर संभाजी महाराज यांची एवढ्या क्रूरतेने हत्या करतो, ते पाहवत नाही. कुठे असे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज, बाजीराव पेशवा यांच्यासारखे महानायक महाराष्ट्रात जन्मले आणि कुठे आजकालचे तरुण. हा चित्रपट पाहावा लागेल, महानायकांकडून शिकावे लागेल.
प्रत्येक तरुण, प्रत्येक भारतीयांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर जो 'छावा' नावाचा चित्रपट आहे तो पाहायला हवा. मी हात जोडून विनंती करतो, प्लीज आताच तिकीट काढा आणि छावा पाहा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
-----------------------------------------

