गोकुळच्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन : देशपतळीवरील सहकारातील पहिला प्रकल्प : गोकुळची वीज बिलात सहा कोटीची बचत होणार

Kolhapur news
By -

 

              


               कोल्हापूर न्यूज नेटवर्क


गोकुळ मार्फत ६.५ मेगा वॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला असून या प्रकल्पामुळे गोकुळची बिलामध्ये अंदाजे ६ कोटी रुपये बचत होणार आहे. गोकुळ मार्फत उभारणी करण्यात आलेला ६.५ मेगा वॅट सोलर प्रकल्प केवळ एक ऊर्जा प्रकल्प नसून पर्यावरण संरक्षण आणि भारताच्या स्वच्छ ऊर्जा अभियानाचा एक महत्वाचा भाग आहे. हे काम देशात पहिल्यांदाच गोकुळ सारख्या एका सहकारी संस्थेने  केले आहे. हा सहकारातील पहिला प्रकल्प असून गोकुळ अमुल पेक्षा मोठा व्हावा यासाठी असे प्रकल्प कार्यान्वित करणार आहे. भविष्यात ऊर्जा निर्मितीसाठी सौर प्रकल्प सक्षम ठरणार असून गोकुळचा चार मेगा वॅटचा विस्तारीकरण करण्याचा मानस आहे अशा पर्यावरण पूरक विजनिर्मितीला चालना देण्याची गरज असून असे उपक्रम विविध सहकारी संस्थांनी राबवावे असे प्रतिपादन नामदार हसन मुश्रीफ यांनी केले.


     गोकुळ  दूध संघाच्या ६२ व्या  वर्धापन दिनाचे औचित्य साधून सोलर ओपन ऍक्सेस स्कीम अंतर्गत लिंबेवाडी ता. करमाळा जि. सोलापूर येथे खरेदी केलेल्या १८ एकर जागेमधील ६.५ मेगा वॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ व करमाळ्याचे आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या हस्ते व गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या व सर्व संचालक मंडळ, मे. सार्जन रिअॅलिटीज प्रा.लि.पुणे चे प्रतिनिधी, दूध संस्थांचे प्रतिनिधी, गोकुळचे अधिकारी यांच्या उपस्थितीत लिंबेवाडी ता. करमाळा जि. सोलापूर येथे उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी नामदार हसन मुश्रीफ बोलत होते. 


  यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, सध्या गोकुळ मुख्यालयाकडील वर्षाकाठी जवळजवळ वीज बिलाचा खर्च १६ कोटी इतका येतो. हा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे ठरविले त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यामध्ये २०० एकरवर पुणे येथील सर्जन रिअॅलिटीज प्रा. लि. ही कंपनी सौर ऊर्जा निर्मिती करत आहेत यापैकी गोकुळने १८ एकर जागा खरेदी करून या जागेमध्ये ६.५ मेगा वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला असून यामुळे एकूणच वार्षिक खर्चामध्ये बचतच होणार आहे. सदर सौर ऊर्जा प्रकल्पाचा जागेसह खर्च रुपये ३३ कोटी ३३ लाख इतका आला असून या प्रकल्पामुळे गोकुळ मुख्यालयाकडील वीज बिलामध्ये प्रतिवर्षी अंदाजे रुपये ६ कोटी इतकी बचत होणार आहे. 

   

सदर प्रकल्प पूर्ण झाला असून प्रत्यक्षात वीज निर्मिती सुरू झाली असल्याचे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले.


यावेळी स्वागत संचालक अभिजित तायशेटे व प्रास्ताविक संचालक अजित नरके यांनी केले. तसेच प्रकल्पाची सविस्तर माहिती मे. सर्जन रिअॅलिटीज प्रा.लि.पुणे चे प्रतिनिधी राजेश बांदल यांनी दिली व आभार संचालक शशिकांत पाटील-चुयेकर यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.एम.पी. पाटील यांनी केले तसेच या कार्यक्रम प्रसंगी गोकुळ दुध संघ व मे. सर्जन रिअॅलिटीज प्रा. लि. पुणे. यांच्यामार्फत उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.


--------------------------------------------