कोल्हापूर न्यूज / वि .रा.भोसले
शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलून ते छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ ठेवावे असा आग्रह हिंदू जनजागृती समिती मार्फत करण्यात आला आहे.
शिवछत्रपतींच्या विषयी वाटणाऱ्या अपार प्रेम,अभिमान आणि श्रध्दा यातून हा आग्रह होत आहे यात शंकाच नाही.
या बांधवांना कळकळीने सांगावेसे वाटते की, असा नामविस्तार करणे म्हणजे आईला आई म्हणण्याऐवजी तिचे सगळे नाव घेऊन हाक मारणे असे होईल.
जिजाऊ माँ साहेब त्यांना शिवबा म्हणायच्या.
या संबोधनात मातेचा जिव्हाळा ओतप्रत भरलेला होता.
शिवाजी विद्यापीठ या नावात सुद्धा असाच जिव्हाळा काठोकाठ भरलेला आहे.
नाव विस्तार केला तर विद्यापीठाचे बोली भाषेतील नाव कसे होईल पहा.
छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ या विस्ताराचे संक्षिप्त नाव मराठीत छ. शि. म. वि.असे होईल.
इंग्रजीत ते C S M U असे होईल.
एक ठळक उदाहरणच पाहू.लपवून कशाला ठेवायचे !
मुंबईतील एका मोठ्या रेल्वे स्थानकाला
पूर्वी व्हिक्टोरिया टर्मिनस असे नाव होते.ते व्हीटी म्हणूनच ओळखले जायचे. व्हिक्टोरिया हे इंग्लडच्या राणी चे नाव.
ते फक्त कागदोपत्रीच राहिले. VT तले V म्हणजे काय ते नव्या पिढीला कळलेच नाही.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नातून ते नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे ठेवले गेले.
त्याचे मराठीत छ. शि. म. ट.असे संक्षिप्त नाव झाले.शिवाजी हे नावच लुप्त झाले.
हेच नाव इंग्रजीत CSMT असे झाले.ते नीट म्हणता येत नसल्याने अजूनही मुंबईत त्या स्टेशनला व्हीटी असेच म्हणतात.शिवाजी हे नाव पुन्हा गायब.
शिवाजी विद्यापीठाच्या नाम विस्तारात सुद्धा याचाच प्रत्यय येणार आहे.
छोट्या नावा मुळे आपल्या आराध्य दैवताचे नाव सतत जिभेवर आणि हृदयात रहाणार आहे.
तेच गरजेचे आहे.
पंढरीच्या पांडुरंगाला विठ्ठल म्हणून जिव्हाळ्याने हाक मारली जाते.
विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवले की भक्तांना केवढे कृतार्थ वाटते !
शिवाजी महाराज हे आपले असेच एक दैवत आहे.
रयत ही त्यांना माते समान होती.
राजे साऱ्या जगाचे झाले आहेत.पाश्चात्य देशांनी सुध्दा त्यांच्या युद्धतंत्रातून प्रेरणा घेतली आहे.जपान सारख्या पौर्वात्य देशात त्यांचे पुतळे आहेत.
आणखी काय हवं !
त्यांचा नाम विस्तार फक्त फलकावर व कागदावरच राहील .
जिभेवर फक्त संक्षिप्त नावच राहील.
छ. शि. म. वि.
किंवा
CSMU
महाराजांच्या प्रेरणा दायक नावाची ती अवहेलना ठरेल.
तेंव्हा शिवभक्तांनो नामविस्ताराचा अट्टाहास धरू नका.
शिवाजी , शिवबा
तुमच्या हृदयात राहू द्या.तुम्ही तुमच्या लाडक्या राजांची रयत आहात. माय आहात.
---------------------------------

