कोल्हापूर न्यूज नेटवर्क
वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री 'प्रवासाचे अंतर जास्त होत असल्याचे' कारण देऊन वाशिम पालकमंत्री पदाला राम राम केला आहे , पण त्यांना स्वतःचा कोल्हापूर जिल्ह्याचा गड भक्कम करावयाचा असल्याने त्यांनी हा राजीनामा दिल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद आपण जेष्ठ असल्याने आपणालाच मिळेल अशी नामदार हसन मुश्रीफांना अपेक्षा होती . पण त्यांना ज्या वेळेला कोल्हापूरचे पालकमंत्री पद मिळाले नाही ,त्यावेळेला त्यांनी आपण जनतेच्या मनातील पालकमंत्री असे म्हणत अप्रत्यक्ष नाराजी वर्तवली होती. भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदे सेना आणि भाजपच्या समाेर आपल्या पक्षाचा पाया भक्कम करण्यासाठी त्यांना कोल्हापूर वर पूर्ण वेळ लक्ष केंद्रित करावयाचे आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद ,कोल्हापूर महापालिका , जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाची सत्ता आणण्यासाठी त्यांना जास्त वेळ द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर सहकारातील कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा बँक, गोकुळ दूध संघ आणि बाजार समिती वर ही त्यांना आपली पकड भक्कम करावयाची आहे. विशेष करून कागल तालुक्यात वाढलेली चुरस पाहता त्यांना स्वतःच्या कागल तालुक्यावर तर जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. त्यामुळे त्यांनी वाशिमचे पालकमंत्री पद नाकारले असल्याची ही राजकीय वर्तुळात चर्चा आहे .
वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्या जिल्ह्यातही राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी त्यांना जास्त वेळ द्यावा लागला असता , त्यासाठी त्यांना आठवड्यातील दोन-तीन दिवस तरी वाशिम जिल्ह्यासाठी द्यावे लागले असते , जेणेकरून स्वतःच्या कोल्हापूर जिल्ह्याकडे पूर्ण वेळ लक्ष देणे शक्य झाले नसते.
--------------------------------------

