तत्कालीन शिक्षण मंत्र्यांचे पत्र आयपीएस बिरदेव साठी ठरले प्रेरणादायी : बिरदेवची कृतज्ञता पाहून तत्कालीन शिक्षण मंत्र्यांच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू

Kolhapur news
By -

 

            


             


    कोल्हापूर न्यूज नेटवर्क


      तत्कालीन शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा राज्याचे शालेय  शिक्षणमंत्री असतानाची ही गोष्ट. कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील यमगे या अतिशय छोट्या गावच्या बिरदेव सिद्धापा डोणे या मुलाला दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के मार्क्स मिळाल्याचे कळले. शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी उत्सुकतेने बिरदेवची चौकशी केली.  अधिकारी वर्गाने शिक्षण मंत्री  राजेंद्र दर्डा यांना हा मेंढपाळ कुटुंबातला मुलगा असल्याचे सांगितले . आईवडील रोजंदारीवर जातात, हा मुलगा मेंढ्या चारून शिकतो. शिक्षण मंत्री  राजेंद्र दर्डा यांना या मुलाच्या जिद्दीचे  फार कौतुक वाटले. बिरदेवचे कौतुक करणारे एक पत्र राजेंद्र दर्डा यांनी त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना पाठवले आणि विसरूनही गेले. 


   पण इतक्या वर्षांनी हा बिरदेव अचानक शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांना पुन्हा भेटला , आणि तोही भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेला एक महत्वाकांक्षी तरुण म्हणून ! 

यूपीएससी परीक्षेत ५५१ वी रँक मिळवून उत्तीर्ण झाल्याची बातमी बिरदेवच्या  मित्राने त्याला फोनवर सांगितले, तेंव्हा बिरदेव शेतातच मेंढ्या चारत होता. 'मेंढपाळाच्या मुलाने यूपीएससी क्रॅक केल्या' ची यशोगाथा सांगणाऱ्या एका व्हायरल व्हिडिओत बिरदेवने तत्कालीन शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डांची आवर्जून आठवण काढल्याचे ऐकून, शिक्षण मंत्री दर्डा यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले...         


इतक्या वर्षांपूर्वी  शिक्षण मंत्री दर्डा यांनी पाठवलेल्या त्या पत्राची  आठवण काढून बिरदेव सांगत होता... ते पत्र मिळताच मुख्याध्यापकांना खूप आनंद झाला. शाळेला खुद्द शिक्षण मंत्र्यांचे पत्र येण्याची ही पहिलीच वेळ.  मुख्याध्यापकांनी त्या पत्राची रंगीत झेरॉक्स त्याला दिली आणि मूळ पत्र शाळेच्या रेकॉर्डवर ठेवले.  


 

शिक्षण मंत्र्यांची एक छोटीशी कृती... कुणाच्या आयुष्याचा आधार होऊ शकते याचा हा अनुभव शिक्षण मंत्र्यांना कृतार्थ वाटायला लावणारा होता !


 त्यामुळे शिक्षण मंत्र्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले ..."बिरदेव, असाच मोठा हो ! तुझ्यासारख्या अधिकाऱ्यांच्या हाती देशाचे भवितव्य लखलखतेच असेल ! "


    -----------------------------------