कोल्हापूर न्यूज नेटवर्क
भारतीय पोलिस सेवेत आय पी एस म्हणून निवड झालेले कागल तालुक्यातील यमगे गावचे बिरदेव डोणे यांची मुरगूड व यमगे या गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
पहेलगाव येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभर दुखवटा होता .त्यामुळे बिरदेव यांचा सत्कार दोन दिवस पुढे ढकलला गेला होता.तो आज रविवार दिनांक २७ एप्रिल रोजी घेण्यात आला मुरगूड मधील शिवतीर्थावरून ही मिरवणूक सुरू झाली.तेथे शिवभक्तांच्या वतीने बिरदेव यांना शिवप्रतिमा भेट देण्यात आली. मुरगूड हून ही मिरवणूक बाजारपेठेतून बिरदेव यांच्या गावी यमगे येथे नेण्यात आली.तेथे वेशीवरच त्यांच्या वर जे सी बी मधून भंडारा व फुलांची उधळण करण्यात आली.
आदमापूर येथील श्री बाळु मामांचा दर महिन्याचा अमावस्या उत्सव आज रविवारीच आला आहे.बिरदेव हे मामांच्याच धनगर समाजाचे असल्याने बाळूमामाच जणू बिरदेवच्या रूपाने गावात आल्याची भावना येथील कांहीं भाबड्या स्री भक्तांनी व्यक्त केली. आय पी एस बिरदेव यांचे व्यक्तिमत्व सुद्धा हसतमुख चेहरा,उंचीपुरी देहयष्टी ,विनयशील स्वभाव व साधेपणा यामुळे अधिक खुलून दिसत होते. आपणच जणू आय पी एस झालो आहोत असे त्यांच्या जिवलगांना वाटत असावे.
सर्जेराव भाट ,पत्रकार ओंकार पोतदार, विशाल भोपळे ,इत्यादीसह अनेक शिवभक्तांनी व यशवंत सेनेने यासाठी परिश्रम घेतले.पत्रकार अनिल पाटील यांनी निवदन केले.
------------------------------------