१००% सौर उर्जेवर चालणारं कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलं गाव

Kolhapur news
By -

               


               कोल्हापूर न्यूज नेटवर्क


          गावची लोकसंख्या जेमतेम हजाराच्या घरात. लोकसंख्या कमी असल्यानं महसूलही दोन ते तीन लाखांच्या आकड्यातच ग्रामपंचायतीला मिळायचा. १०० एक घरांचं गाव असल्यामुळं राजकीय नेत्यांचाही या वाडीकडं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा. मात्र, ग्रामस्थांनी गावाचा कायापालट करायचं ठरवलं आणि २००४ पासून राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांमध्ये गावाचा समावेश होत गेला.कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातील डोंगरदऱ्यांमध्ये वसलेलं छोटसं गाव आहे शेळकेवाडी. 


 यामुळं राज्यस्तरीय कोणत्याही स्पर्धेत शेळकेवाडी पहिल्या क्रमांकावर राहिली, बक्षिसांच्या मिळालेल्या रकमेतून गावात हागणदारीमुक्त मोहीम राबविण्यात आली. तर, बायोगॅस प्रकल्प राबवणारं आणि १००% सौर उर्जेवर चालणारं जिल्ह्यातील पहिलं गाव म्हणून शेळकेवाडी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जात आहे. 



 एकजूट दर्शवणारा गुलाबी रंग गावातील सर्व घरांना देण्यात आलाय. यामुळेच 'पिंक व्हिलेज' म्हणूनही या गावाचा गौरव होत आहे. 


१००% सौर ऊर्जेवर चालणारं गाव 


"केंद्र सरकारच्या 'पंतप्रधान सूर्यघर योजने'च्या माध्यमातून जिल्ह्यात पहिलं १००% सौर उर्जेवर चालणारे गाव म्हणून शेळकेवाडी गावानं जगाच्या नकाशावर आपली ओळख निर्माण केली आहे. शेळकेवाडी ग्रामपंचायतीनं ग्रामस्थांच्या मदतीतून सौरऊर्जेचा प्रकल्प पूर्ण करून जिल्ह्यातील पहिलं सौरऊर्जेवरील गाव होण्याचा मान मिळवलाय. विशेष म्हणजे गावातील प्रत्येक घरातून सोलर सिस्टीमसाठी लागणाऱ्या ६७ हजारांपैकी केवळ ५ हजार रुपये घेण्यात आले. गावाला सौरऊर्जेतून स्वयंपूर्ण करण्यासाठी मिळालेल्या पारितोषिकाच्या रक्कमेतून सोलरसाठी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीनं वाटा उचलला.


 गावातील कुटुंबांची एकूण संख्या १०२ आहे, १ कि. वॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी ६७ हजार ६०० इतका खर्च अपेक्षित आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या 'पंतप्रधान सूर्यघर योजने'तून लाभार्थ्यांना ३० हजारांचं अनुदान मिळतं. तर, या योजनेत लाभार्थ्यांचा हिस्सा ५ हजार इतका आहे. या योजनेसाठी राज्य सरकारच्या जिल्हा परिषदेकडून १४ हजार ३०० रुपये मिळतात, तर ग्रामपंचायतीकडून या योजनेसाठी १९ हजार ३०० रुपये मिळतात. विविध शासकीय योजनांमध्ये घेतलेल्या सहभागातून मिळालेल्या रक्कमेच्या आधारावर प्रत्येक कुटुंबाचा पाच हजारांचा हिस्सा ग्रामपंचायतीनं भरला. गावातील १०० घरांमध्ये १ कि. वॅट प्रकल्प बसविण्यात आले. तर २ घरांत २ कि. वॅट प्रकल्प बसविण्यात आले. 


विशेष म्हणजे नावीन्यपूर्णमधून सोलरसाठी ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, व्यायामशाळा, पथदिवे, पाणी पुरवठा योजना यांना विशेष निधी सुद्धा मिळवण्यात ग्रामपंचायत शेळकेवाडीला यश मिळाल आहे. 


     ----------------------