मुंबई : गत काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाची चर्चा सुरू आहे. पण राज ठाकरे यांनी गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.त्यामुळे राज ठाकरे आपले बंधू उद्धव यांच्यासोबत युती करणार की भाजपसोबतच राहणार?याविषयी राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.
यासंबंधीच्या माहितीनुसार, मुंबईतील ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली. या दोन्ही नेत्यांत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर भेट झाली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आजच्या वेळापत्रकात ताज लँड्स हॉटेलचा कुठेही उल्लेख नव्हता. त्यामुळे त्यांची राज यांच्यासोबत झालेली ही अनपेक्षित भेट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णायक ठरेल का? विशेषतः ठाकरे गटासोबतच्या संभाव्य युतीला ब्रेक लावून मनसे लोकसभा निवडणुकीसारखाच पुन्हा भाजपला पाठिंबा देणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे गत काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीची चर्चा सुरू झाली होती. प्रथम राज ठाकरे व त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना टाळी देण्याचे सूतोवाच केले होते. त्यामुळे या चर्चेला अधिकच बळ मिळाले होते. पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकीय कौशल्याद्वारे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीला पूर्णविराम दिल्याचे दिसून येत आहे.
-------------------------------