आजवर आपण अनेक पिकांची शेती पाहिली आहे. पण एखाद्या गावात सापांची शेती केली जाते, असं ऐकलं तर आश्चर्य वाटेल . चीन देशात झेजियांग नावाच्या प्रांतात 'जिसिकियाओ' नावाचं एक छोटं गाव आहे. या गावाला चीनमध्ये 'स्नेक व्हिलेज' म्हणून ओळखलं जातं. कारण इथे तीस लाखांहून अधिक साप पाळले जातात ! आणि या सापांच्या शेतीतूनच गावकरी पैसे कमवतात !
या गावात यंग होंग चेंग नावाचा एक गरीब शेतकरी होता. एकदा तो आजारी पडला. मात्र त्याच्याकडे पैसे नव्हते. मग त्याने जंगलातून एक साप पकडला आणि त्याच्यापासून औषध तयार केलं. ते घेतल्यानंतर तो बरा झाला! त्याच्या लक्षात आलं की साप केवळ विषारी नसतात, तर औषधांसाठीही उपयोगी ठरतात !
मग त्याने सापांची शेती सुरू केली. त्याचं पाहून इतर गावकऱ्यांनीही हेच करायला सुरुवात केली.इथे किंग कोब्रा, वायपर, अजगर, क्रेट आणि इतर अनेक विषारी साप पाळले जातात. एक फाइव्ह स्टेप साप नावाचा अतिशय धोकादायक सापही इथे आहे. म्हणतात, तो कुणाला चावला तर तो माणूस फक्त पाच पावलं चालतो आणि मग... मृत्यू ! म्हणूनच गावकरी या सापापासून नेहमी सावध राहतात. या सापांचा उपयोग औषधं तयार करण्यासाठी होतो. सापाच्या विषापासून अॅटिव्हेनम (सापविरोधी इंजेक्शन), कर्करोग,संधिवात आणि इतर आजारांवर औषधं तयार केली जातात. तर काही ठिकाणी सापाचं मांस खाल्लं जातं. सापाची त्वचा बूट, पर्स, पट्टे तयार करण्यासाठी वापरली जाते.
शेतीसारखंच फार्मिंग ! या गावात घरांमागे मोठ्या पेट्यांमध्ये किंवा बंदिस्त ठिकाणी साप पाळले जातात. त्यांची काळजी घेतली जाते, वेळोवेळी खाऊ दिला जातो, आणि विष गोळा केलं जातं. काही फार्ममध्ये पाहुण्यांसाठी 'स्नेक म्युझियम' सुद्धा आहे.
..........................