कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्यावतीने सोमवार दि. १८ ऑगस्ट, २०२५ रोजी एक दिवस विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग कार्यालयासमोर केले जाणार आहे.अशी माहिती प्रसिद्धीस पत्रकाद्वारे संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. वेतन २०१९/प्र.क्र.४८/टी.एन.टी. ३ दि. १४ मार्च, २०२४ च्या निर्णयाने दि. ०१/०१/२०२४ पासून पुढे अश्वासित प्रगती योजना २४ वर्षानंतरचा दुसरा लाभ देणेबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे शिक्षकेतर कर्मचारी यांना ( उदा. लिपीक, प्रयोग शाळा सहाय्यक, शिपाई) सदर लाभानुसार वेतन निश्चिती करणेत आली. पण दि. ३१ जुलै, २०२५ च्या शासन निर्णयाने कांही दुरुस्त्या करणेत आलेल्या आहेत. त्यामुळे चतुर्थ श्रेणी कर्मचा-यावरती अन्याय होणार आहे. त्यामुळे सदर शासन आदेशातील वेतन श्रेणीमध्ये बदल करणे तसेच खालील मागण्यांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघनटेच्यावतीने शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग कार्यालयासमोर सोमवार दि. १८/०८/२०२५ रोजी दुपारी ०१ ते ०३ वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या खालील प्रमाणे अशा की,
शिपाई पदावरील २४ वर्षानंतरचा दुस-या लाभाची वेतन श्रेणी ही एस-५ ऐवजी एस-४ मध्ये करणेबाबत झालेल्या आदेशामध्ये दुरुस्ती करून वेतन श्रेणी पूर्वी प्रमाणे एस-५ मध्येच करणेत यावी. शिक्षकेतर कर्मचारी भरती बंदीबाबतचा दि. २८ मे, २०२५ चा आदेश मागे घेऊन शिक्षकेतर भरती सुरु करावी.
२४ वर्षानंतरचा आश्वासीत प्रगती योजनेचा दुसरा लाभ पुर्वलक्षी प्रभावाने शासकीय कर्मचा-याप्रमाणे लागू करण्यात यावा.१० : २० : ३० आश्वासीत प्रगती योजना शासकीय कर्मचा-याप्रमाणेच शालेय शिक्षण विभागास लागू करावी.चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती ही शाळा संहितेनुसार नियमित वेतनावरतीच करणेत यावी.
या सर्व मागण्यांचा शासनाने गांभीर्याने विचार करून आम्हा शिक्षकेतर कर्मचा-यांना न्याय द्यावा व या मागण्याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही एक दिवस धरणे आंदोलन करत आहे. तरी आमच्या मागण्यांचा विचार करून आम्हांस न्याय द्यावा ही नम्र विनंती. या लेखी निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांची सही आहे.
------------------------