कोल्हापूर न्यूज नेटवर्क
युवक ही आपल्या देशाची शक्ती असून मजेत जीवन जगताना ध्येय निश्चित करा.. व्यसनांपासून दूर रहा. स्क्रीन टाईम हा बुक टाईम, ग्राउंड टाईम आणि स्टडी टाईम बनवा.. अधिकाधिक ज्ञान मिळवा. खडतर परिश्रम घेऊन उत्तम करिअर घडवा आणि यशस्वी होऊन आपल्या जिल्ह्याचे नाव जगभरात उज्वल करा, अशा शब्दांत यशस्वी जीवनाचा मूलमंत्र जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी युवकांना दिला.
जिल्हा प्रशासन, सहायक आयुक्त समाज कल्याण, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विवेकानंद कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त विद्यार्थी सहाय्यता जनजागृती अभियान कार्यक्रम जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृती भवन येथे पार पडला. यावेळी सारथी उपकेंद्राच्या सह व्यवस्थापकीय संचालक किरण कुलकर्णी, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, पोलीस उप निरीक्षक सायली पडवळ, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, प्रख्यात व्याख्याते प्रा. मधुकर पाटील तसेच अन्य मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उत्पन्नाचा दाखला, राष्ट्रीयत्वाचा दाखला, जात व नॉन क्रिमीलेअर दाखल्यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, देशाचे भवितव्य युवकांच्या हाती आहे. युवा दशेत खडतर परिश्रम घेतलेल्या अनेक व्यक्तींनी देशाचे नेतृत्व केले आहे तर बिरदेव डोणे यांच्यासारख्या युवकांनी ध्येयाप्रती एकनिष्ठ राहून भरघोस यश मिळवले आहे. 'उठा, जागे व्हा, उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत थांबू नका' ही शिकवण देणारे स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवकांनी चौफेर व्यक्तिमत्व घडवावे.
उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी म्हणाल्या, विद्यार्थ्यांसाठी विविध विभागांच्या वतीने शासकीय योजना राबवल्या जात आहेत. शासनाच्या योजनांची माहिती युवकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी महाविद्यालयांमध्ये समन्वय समिती स्थापन करण्यात येत आहे. युवकांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन प्रगती साधावी.
पाेलीस उप निरीक्षक सायली पडवळ यांनी अंमली पदार्थांच्या सेवनाचे व सोशल मीडियाचे दुष्परिणाम सांगितले. सोशल मीडियामुळे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढत असून अनोळखी व्यक्तीशी सोशल मीडिया द्वारे संपर्क वाढवू नका वैयक्तिक माहिती सोशल मीडियाद्वारे पाठवू नका. व्यसनांपासून दूर राहा, असे आवाहन केले.
कौस्तुभ गावडे म्हणाले, युवाशक्ती ही देशाची खरी शक्ती आहे. आदर्श युवा घडवण्याचे मोलाचे कार्य स्वामी विवेकानंदांनी केले आहे. मोबाईलचा वापर करा, पण चॅट जीपीटी ॲप व एआयसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करुन ज्ञानात भर घाला. स्क्रीन टाईम प्रॉडक्टिव्ह टाईम बनवा. विद्यार्थ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन आपल्या अंगच्या कलागुणांचा कौशल्यांचा विकास घडवून प्रगती करावी.प्रा. प्रवीण बागडे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. संदीप पाटील यांनी आभार मानले.
-------------------