कोल्हापूर न्यूज नेटवर्क
शरद पवारांना दोन व्यक्ती भेटून केलेल्या गौप्यस्फोटाबाबत विचारले असता मंत्री मुश्रीफ कोल्हापुरात म्हणाले, याबद्दल तर मला खरोखरच आश्चर्य वाटते. त्या व्यक्तींची नावे, पत्ते, फोन नंबर तरी लिहून ठेवले असतीलच की पवारसाहेबांनी. त्यांना विचारायला हवं होतं की, हे कसं करून देणार आहात ? विधानसभा निवडणूक होऊन आजघडीला नऊ महिने होऊन गेले आणि पवारसाहेब ही गुगली आता टाकत आहेत.तसेच संजय राऊतही म्हणत आहेत, की असे लोक येऊन गेले. अशा कपोलकल्पित गोष्टी सांगून लोकांचे फक्त मनोरंजनच होईल. कोल्हापुरात पत्रकारांशी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले ,कोल्हापूर महापालिकेच्या अनेक निवडणुकांमध्ये आम्ही दुसऱ्या स्थानावर आलो आहोत. आम्ही महापौर, स्थायी समिती सभापती पद अशी सगळी पद घेतली आहेत. यावेळीसुद्धा महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होणार. आमची कासवाची चाल आहे.
सर्किट बेंच तयारीची पाहणी करणाऱ्यांमध्ये तुम्ही दिसत नाही, या प्रश्नावर मंत्री मुश्रीफ म्हणाले, मी काही पाहणी करायला जाणार नाही. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाची कार्यक्रम आचारसंहिता वेगळी असते. ज्यावेळी हे कोल्हापूरचे जिल्हा न्यायालय बांधले त्यावेळी तत्कालीन माननीय उच्च न्यायाधीशानी मला बोलावून घेतले. त्यांनी सांगितले की, या इमारतीचा सर्वोत्कृष्ट प्लॅन तुम्ही केलेला आहे. परंतु; सगळ्या जिल्ह्यातून अशी मागणी पुढे आली तर त्या इमारती बांधाव्या लागतील. त्यानुसार ही जिल्हा न्यायालय इमारत ज्यावेळी बांधण्यात आली, त्यावेळी ती सर्वोत्कृष्ट जिल्हा न्यायालयाची इमारत ठरली. आता तो टाईप प्लॅन म्हणून सर्व राज्यभर राबविण्यात येणार आहे .