रक्ताचा पुत्र आईने गमावला. सहोदर भाऊ बहिणीनं गमावला. त्याची भरपाई होणार नाही हे खरं ...पण देवाभाऊ सहृदयतेनं आपल्या बहिणीसाठी धावून गेला.

Kolhapur news
By -

 

                   


 मुंबई मुंबईपासून तब्बल ६ हजार ८०० किलोमीटर अंतरावरचं एक अज्ञात स्थळ. परदेश. परकी भाषा. अपरिचित संस्कृती. अनोळखी माणसं. सगळंच परकं. अशा ठिकाणी २३ वर्षाच्या एका तरुणाचं हृदय अचानक बंद पडतं. क्षणात होत्याचं नव्हतं. सगळं संपतं. मराठी मुलुखातल्या त्या तरुणाचा जागच्या जागी मृत्यू होतो. जीवनाचा शेवट आपल्या घरापासून दूर, आईपासून दूर, आपल्या गावापासून मित्रांपासून दूर असा कुठं तरी होईल याची पुसटशीही कल्पना त्याला नसते. त्याच्यावर माया करणारी आई, बहीण, मित्र हे सगळे असतानाही एक जीव अचानक अनोळखी स्थळी पार्थिव बनून जातो.


युरोपातल्या बाल्कन प्रांतातील क्रोएशिया देशात ही दुःखद घटना नुकतीच घडली. हा तरुण  मुंबईतल्या उपनगरात राहणारा. (त्याच्या कुटुंबावर इतका दुर्धर प्रसंग ओढवलेला असताना त्याची ओळख उघड करणं असंवेदनशील ठरेल.) तो आपल्या लाडक्या बहिणीला भेटायला बर्लिनला (जर्मनी) गेला होता. तिथून क्रोएशियात कौटुंबिक सहलीला जायचं असं ठरलं. मग तो बहीण आणि तिच्या यजमानांसह क्रोएशियाला गेले. किती क्षण आनंदात एकत्रित घालवले असतील त्या बहिणभावांनी. पण हे क्षणभंगूर ठरणार असल्याची कल्पना त्या भावाबहिणीला त्यावेळी कुठं होती? यंदाची राखी पौर्णिमा दुःखाचा डोंगर घेऊन कोसळणार हे त्या बहिणीला कसं माहीत असणार?


'कार्डीएक अरेस्ट'नं लाडका भाऊ कायमचा सोडून गेला. क्रोएशियासारख्या परमुलुखात ती ही नवखी होती. भावाचं पार्थिव मुंबईला पाठवायचं कसं? मायदेशी मुंबईत असणाऱ्या आईला कसं सावरायचं? त्या दुःखी बहिणीपुढं असंख्य प्रश्न निर्माण झाले. कायदेशीर बाबी, तांत्रिक पेच यातून मार्ग काढणं त्या अवघड प्रसंगी बहिणीसाठी सोपं असेल का  ? तेही घरापासून शेकडो किलोमीटर दूर? 


मायदेशापासून दूर असणाऱ्या या बहिणीची व्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचली. देवेंद्रजींना प्रसंगाचं गांभीर्य लक्षात आलं. वेळेची लढाई होती. बहिणीनं भाऊ गमावला आणि आईनं पुत्र गमावला होता. त्यालाही आता काही तास उलटले होते. मुंबईत असणारी आई आणि क्रोएशियात असणारी बहीण या दोघींचे अश्रू थांबत नव्हते. त्यांना आशेचा किरण दिसत नव्हता. 'माझ्या लाडक्या मुलाचं अंत्यदर्शन तरी मला घेऊ द्या,' 'त्याच्या पार्थिवावर आमच्या श्रद्धेनुसार अंतिमसंस्कार आम्हाला करू द्या,' अशी आर्जव त्या मातेनं केली. देवेंद्रजींनी सगळी कामं बाजूला टाकली. दूरदेशी असणाऱ्या त्या बहिणीला आणि मुंबईतल्या मातेला आश्वस्त केलं..."आता सगळी जबाबदारी माझी. तुम्ही काळजी करू नका."


देवेंद्रजी कामाला लागले. शक्य तितक्या लवकर क्रोएशियातून पार्थिव मुंबईत आणायचं होतं. दिल्लीत संसदेच्या अधिवेशनाची घमासान चालू होती. त्यातूनही देवेंद्रजींनी देशाचे परराष्ट्रमंत्री श्री. एस. जयशंकर यांच्याशी संवाद साधला. प्रश्न केवळ मराठी तरुणाच्या मृत्यूचा नसून आईच्या आणि बहिणीच्या भावनेचा आहे हे त्यांना सांगितलं. एस. जयशंकर यांनीही सूत्रं हलवली.


त्यानंतर क्रोएशियातील भारतीय दूतावासाने जलद हालचाली केल्या. मुंबईत अश्रू ढाळणाऱ्या आईसाठी आणि क्रोएशियात असहाय्य झालेल्या बहिणीसाठी देवेंद्रजींनी दिल्लीतील मुख्यमंत्री कार्यालयाची यंत्रणा कामाला लावली. तांत्रिक, कायदेशीर, लॉजिस्टिक असे सर्व सोपस्कार पार पाडण्यात आले. अखेरीस हा वेदनादायी प्रवास संपला. अवघ्या काही दिवसांपूर्वी हसतखेळत ज्या मुलानं मुंबईतून आईचा निरोप घेतला होता, तोच मुलगा क्रोएशियातून मुंबई परतला पण पार्थिव स्वरूपात. आई आणि कुटुंबाच्या इच्छेनुसार त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 


रक्ताचा पुत्र आईने गमावला. 

सहोदर भाऊ बहिणीनं गमावला.

त्याची भरपाई होणार नाही हे खरं.


...पण देवाभाऊ सहृदयतेनं आपल्या बहिणीसाठी धावून गेला. 

पोटच्या मुलाप्रमाणं देवाभाऊनं त्या मातेच्या हाकेला प्रतिसाद दिला.


                -----------------------