दहावी बारावी उत्तरपत्रिकांचे लेखन अचूकपणे कसे कराल ? : विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शिक्षकांचे डिजिटल 'शस्त्र'!

Kolhapur news
By -

 

         


      कोल्हापूर न्यूज नेटवर्क    

 

राज्यात बोर्ड परीक्षांमध्ये नेहमीच उज्ज्वल निकालांनी अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाने संयुक्तपणे विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे अचूकपणे लेखन कसे करावे, या  विषयावर मार्गदर्शन करणारे व्हिडिओ तयार करण्यासाठी मंडळाने शिक्षकांसाठी अभिनव व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आयोजित केली आहे. 


'बोर्ड परीक्षेचा राजमार्ग, सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे' या कृतीकार्यक्रमांतर्गत आयोजित या स्पर्धेचे संयुक्त परिपत्रक कोकण बोर्डाच्या सचिव पुनीता गुरव आणि कोल्हापूर बोर्डाचे सचिव सुभाष चौगुले यांनी गुरुवारी निर्गमित केले आहे. 


मागील वर्षी कोल्हापूर मंडळाने तयार केलेले व्हिडिओ राज्य मंडळाने स्वीकारल्याच्या यशानंतर, आता पाच जिल्ह्यांतील शिक्षकांना थेट विद्यार्थ्यांच्या यशात योगदान देण्याची संधी मिळाली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, अभ्यासाची आवड निर्माण करणे आणि लेखनाचे कौशल्य विकसित करून परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी सक्षम करणे हा आहे.


ही स्पर्धा कोल्हापूर विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि कोकण विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमधील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक किंवा त्यांचे विषय शिक्षक आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा त्यांचे विषय शिक्षक यांच्यासाठी खुली आहे. शिक्षकांनी व्हिडिओ निर्मिती स्वतः करणे आवश्यक आहे, मात्र तांत्रिक बाबींसाठी ते सहाय्यकाची मदत घेऊ शकतात. विशेषतः, नोंदणी अर्जामध्ये संबंधित शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांची किंवा मुख्याध्यापकांची शिफारस असणे आवश्यक आहे. सहभागी होण्यासाठी नोंदणी शुल्क नाही.


शिक्षकांनी इयत्ता १०वी व १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शक व्हिडिओ तयार करायचे आहेत. इयत्ता १०वी साठी मराठी (प्रथम भाषा), हिंदी (द्वितीय/तृतीय भाषा), इंग्रजी (द्वितीय/तृतीय भाषा), बीजगणित, भूमिती, विज्ञान भाग-१, विज्ञान भाग-२, इतिहास आणि भूगोल या सर्व विषयांचा समावेश आहे. 

इयत्ता १२वी साठी कला, वाणिज्य व शास्त्र शाखांमधील सर्व महत्वाचे विषय समाविष्ट आहेत:

कला शाखा: इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र.

वाणिज्य शाखा: पुस्तपालन व लेखाकर्म, वाणिज्य संघटन, चिटणासाची कार्यपध्दती, सहकार.

शास्त्र शाखा: गणित व संख्याशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र.

याशिवाय, सर्व शाखांसाठी महत्त्वाचे असणारे भाषिक विषय मराठी, इंग्रजी व हिंदी या विषयांवरही व्हिडिओ तयार करता येतील.


व्हिडिओची लांबी ०७ ते १० मिनिटांदरम्यान असणे आवश्यक आहे. व्हिडिओमध्ये विषयाचा आशय, विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन, विषयाची भीती कमी करणे, उत्तरपत्रिका सोडवताना घ्यावयाची काळजी, प्रश्ननिहाय भारांश, उत्तरलेखन पध्दती, गुणांकन निकष आणि वेळेचे नियोजन या बाबींचा समावेश असावा.


व्हिडिओ हा विद्यार्थ्यांना सहजपणे आकलन होईल अशा भाषेत रेकॉर्ड केलेला असावा. आवाजात सुस्पष्टता आणि योग्य गती असावी, तसेच पार्श्वभूमीवर कोणताही अतिरिक्त आवाज रेकॉर्ड होणार नाही याची काळजी घ्यावी. व्हिडिओचा फॉरमॅट MP4 असावा. चित्रीकरण करताना मोबाईल आडव्या पध्दतीने (Horizontal) पकडलेला असावा आणि ऑडिओच्या स्पष्टतेसाठी कॉलर माईकचा वापर करणे उत्तम ठरेल. व्हिडिओ कॉपीराईट नसलेला आणि व्यावसायिक जाहिरात विरहित असावा; तसेच वापरण्यात येणारी इमेज/मजकूर हा पूर्णपणे कॉपीराईट मुक्त (Creative Commons) असावा. व्हिडिओच्या सुरुवातीला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवश्यक तपशील प्रदर्शित करावा, स्वतःचा परिचय तोंडी सांगू नये.


स्पर्धकांनी आपला व्हिडिओ दिनांक २६ डिसेंबर २०२५ पर्यंत स्वतःच्या YouTube चॅनेलवर अपलोड करणे बंधनकारक आहे. अपलोड करताना Visibility 'Private' अशी सेट करावी. Add details मध्ये 'SSC/HSC, SUB - YEAR -२०२६ परीक्षेसाठी मार्गदर्शक व्हिडिओ' असे संक्षिप्त वर्णन नमूद करावे. एका स्पर्धकाला फक्त एकाच व्हिडिओची लिंक कॉपी करून नोंदणी फॉर्ममध्ये पेस्ट करायची आहे. हा नोंदणी अर्ज (ज्यावर प्राचार्यांची शिफारस आवश्यक आहे) अपलोड केलेल्या व्हिडिओच्या लिंकसह दिनांक २६/१२/२०२५ पर्यंत divkopvideo25@gmail.com या ईमेलवर पाठवावा. ईमेलमध्ये स्पर्धकाचे नाव, पत्ता, विषय आणि मोबाईल नंबर नमूद करणे आवश्यक आहे. स्पर्धेपूर्वी प्रसिध्द झालेला व्हिडिओ ग्राह्य धरला जाणार नाही.


उत्कृष्ट व्हिडिओची निवड १०० गुणांच्या निकषांवर आधारित असेल, ज्यात आशय/मजकूर (५० गुण), तंत्रज्ञानाचा वापर (२० गुण), सादरीकरण कौशल्य (२० गुण) आणि एकंदरीत प्रभाव (१० गुण) यांचा समावेश आहे. निवड झालेल्या व्हिडिओवर विभागीय मंडळाचा हक्क राहील. उत्कृष्ट व्हिडिओ सादर करणाऱ्या शिक्षकांना मंडळामार्फत प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. हे विषयनिहाय उत्कृष्ट व्हिडिओ जानेवारी महिन्यात मंडळाच्या संकेतस्थळावरून व युटयूबवरून प्रसिध्द करून राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केले जातील.


या अभिनव स्पर्धेत जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी होऊन आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करावे, असे आवाहान मंडळांकडून करण्यात आले आहे.

                

           -----------------

 

"पहिल्यांदाच अशी अभिनव स्पर्धा घेण्यात येत आहे. परीक्षार्थींच्या उत्तरपत्रिका लेखनास यातून मार्गदर्शन होणार आहे," 

                 - राजेश क्षीरसागर

                  विभागीय अध्यक्ष

      कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळ.


       -----------------------