कोल्हापूरच्या खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी

Kolhapur news
By -

 

    

                     


  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर अंतर्गत कार्यरत असलेल्या खेलो इंडिया एक्सलन्स सेंटर, कोल्हापूर मधील खेळाडूंनी सन २०२५-२६ च्या शालेय राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये नेत्रदीपक यश संपादन केले आहे. कोल्हापूरच्या या युवा मल्लांनी आपली प्रतिभा सिद्ध करत जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे.


 सिंधुदुर्ग येथे पार पडलेल्या १४ वर्षांखालील शालेय राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पृथ्वीराज धनाजी मोहिते याने द्वितीय स्थान (रौप्य पदक) पटकावले, तर गीतिका प्रकाश जाधव आणि वैभवी सोमनाथ ओहळ यांनी तृतीय स्थान (कांस्य पदक) मिळवले. याव्यतिरिक्त, १७ वर्षांखालील गटात ऋतुजा संतोष गुरव हिने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर गोरखपूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत द्वितीय स्थान (रौप्य पदक) मिळवत जिल्ह्याला मोठे यश मिळवून दिले. तसेच, कस्तुरी सागर कदम हिनेही राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तृतीय स्थान (कांस्य पदक) पटकावले.


 या सर्व यशस्वी खेळाडूंना सुहास पाटील, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांचे मोलाचे पाठबळ आणि कुस्ती प्रशिक्षक मानतेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. खेलो इंडिया एक्सलन्स सेंटर, कोल्हापूर हे यापुढेही उत्कृष्ट खेळाडू घडवून राज्याचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास या निमित्ताने व्यक्त होत आहे.


                   -------------------------