काेल्हापूर न्यूज नेटवर्क
2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक शुक्रवार 19 डसेंबर 2025 रोजी नागपूर संविधान चौक येथे पेन्शनग्रस्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने "लक्षवेध" आंदोलन आयोजित केल्याची माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा. विजय शिरोळकर यांनी दिली. या आंदोलनात महाराष्ट्रातील कान्या कोपऱ्यातून शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्रातील जुन्या पेन्शन योजनेच्या बाबतीत शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आजपर्यंत महाराष्ट्र राज्य पेन्शनग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध अधिवेशन काळात, शिक्षण आयुक्त कार्यालयसमोर बरीच आंदोलन केली. प्रत्येक अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक व्हावी, शिक्षकांचा जुन्या पेन्शन विषयक प्रश्न समजावून घ्यावा या करिता प्रयत्न केले, मागणी केली पण प्रशासनाने “जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, म्हणूनच मुख्य मंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दारी “ लक्ष वेध” आंदोलन संविधान चौक नागपूर येथे शुक्रवार दिनांक 19/12/2025 रोजी धरणे आंदोलन निश्चित केले आहे.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना व मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना तत्काळ सेवानिवृत्तीनंतरचे सर्व लाभ मिळावेत.नागपूर खंडपीठाने आदेशीत केलेल्या काही निवड्यामध्ये तसेच माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेशीत केल्याप्रमाणे आयुक्त शिक्षण पुणे यांच्या अध्यक्षतेखाली केलेल्या समितीची चिरफाड न करता 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अंशतः/ टप्पा अनुदान प्राप्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना तात्काळ जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात यावी. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी प्रमाणेच उपदानासाठी सुद्धा नियुक्ती दिनांकच ग्राह्य धरण्यात यावे. शिक्षण क्षेत्रातील अन्यायकारी नवीन अंशदायी निवृत्ती योजना तात्काळ बरखास्त करून सर्वच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनीच 1982 ची पेन्शन योजना देण्यात यावी. आदी मागण्या संदर्भात महाराष्ट्र राज्य पेन्शनग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने आंदोलन पुकारल्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.
आपल्या हक्काची पेन्शन मिळण्यासाठी सर्व पेन्शनग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दारी नागपूर येथे येण्याचे आवाहन संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा. विजय शिरोळकर, उपाध्यक्ष प्रा. संपत कदम कार्याध्यक्ष प्रा. योगेश्वर निकम , राज्य संघटक प्रा. अभिजीत धानोरकर, सचिव भास्कर देशमुख,सहसचिव सुनील कांबळे , उपसचिव प्रा. निशिकांत कडू, मा. मारोती खेडकर,प्रा.डॉ. गोविंद गोडसे,काकासाहेब कोल्हे, नागपूर जिल्हाध्यक्ष प्रा. राजेंद्र लोखंडे, प्रा.तानाजी शेळके विधी सल्लागार प्रा. ॲड.गजानन ऐडोले, प्रा. प्रकाश शिंदे,शरद चोडणकर, प्रा. प्रकाश गवते यांनी केले आहे. निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे अजित पवार, शालेय तथा क्रीडा प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त तथा नागपूर पोलीस आयुक्त यांना देण्यात आले आहेत.
--------------------------

